पुणे: ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’चा गजर दुमदुमला अन् ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्ये’चा सुरेल प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या मंत्रमुग्ध करणार्या गायकीने सजलेल्या भक्तिरचना ऐकून रसिक भक्तिरंगात रंगून गेले. विविध संतांच्या रचना स्वत: संगीतबद्ध करून पं. अभ्यंकर यांनी रसिकांसमोर सादर केल्या अन् या भक्तिरचनांनी साक्षात पंढरीतल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घडत असल्याची प्रचिती दिली.
प्रत्येक भक्तिरचनेवर होणारा ‘जय जय रामकृष्ण हरी’चा गजर, प्रत्येक भक्तिरचनेला उत्स्फूर्त दाद देणारे रसिक अन् भक्तिपूर्ण झालेले वातावरण असे समीकरण ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्ये’त रंगले... आषाढी वारीनिमित्त जो भक्तीचा सोहळा पंढरीकडे निघालाय तोच सोहळा ‘याचि देही याचि डोळा...’ रसिकांनी अनुभवला. (Latest Pune News)
दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने पंडित संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायकीने सजलेला ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्या’ हा अद्वितीय कार्यक्रम गुरुवारी (दि. 3) आयोजित केला होता अन् पं. अभ्यंकर यांच्या सुमधुर गायकीतील संतरचनांनी जणू आपणही आषाढी वारीचा भाग झालोय, अशी अनुभूती रसिकांना दिली.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मार्केटिंग हेड आदित्य भेंडे, बढेकर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बढेकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सहप्रायोजक बढेकर डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष झाला अन् खर्या अर्थाने या भक्तिसंध्येला सुरुवात झाली. कपाळी गंध लावलेले रसिक, रसिकांची उत्स्फूर्त गर्दी अन् ‘ज्ञानोबा माउली तुकाराम तुकाराम’चा जयघोष सगळीकडे घुमला. त्यानंतर सुरू झाला स्वरांचा प्रवास, भक्तीचा प्रवास...
पं. संजीव अभ्यंकर यांच्या मधुर गायकीने रसिकांची मने जिंकली. सुरुवातीला पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केलेला श्री विठ्ठलाचे रूप उलगडणारा ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...’ हा जगद्गुरू संत तुकाराम यांचा अभंग सादर केला अन् रसिकांच्या मनात साक्षात श्री विठ्ठलाचे रूपच जणू उभे राहिले.
पहिल्या संतरचनेनंतर पंढरीचे माहात्म्य सांगणारा ‘ऐसे पंढरीचे स्थान याहुनी आणिक आहे कोण’ हा संत एकनाथ महाराज यांचा अभंग पं. अभ्यंकर यांनी सादर केला अन् आषाढी वारीतील भक्तीची अनुभूती रसिकांनी घेतली. टाळ्यांचा कडकडाट अन् ‘जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठलचा...’ नामघोष घुमला आणि पं. अभ्यंकर यांच्या दमदार गायकीला रसिकांनीही दिलखुलास दाद दिली. पं. अभ्यंकर यांची सुरेल गायकी, निवेदिका मंजिरी जोशी यांचे अभ्यासपूर्ण निरुपण आणि पं. अभ्यंकर यांना कलाकारांची मिळालेली सुरेख वादनसाथ, स्वरसाथ... हे समीकरण कार्यक्रमात खास ठरले.
संतांच्या रचनांनी आपल्या जगण्याला वेगळा अर्थ दिला आहे, असे सांगत मंजिरी जोशी यांनी प्रत्येक अभंगाचे वैशिष्ट्य उलगडले. त्यानंतर पं. अभ्यंकर यांनी ‘आणिक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्तापासुनिया...’ हा अभंग सादर केला आणि या रचनेलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. पं. अभ्यंकर यांनी संत एकनाथ महाराजरचित ‘कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी ग कान्हा...’ ही गवळण सादर केली, केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पं. अभ्यंकर यांनी सादर केली आणि या भक्तिरचनेने भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली.
समर्थ रामदास स्वामी यांची ‘ध्यान लागले रामाचे...’ ही रचना सादर होताच सभागृहात ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा जयघोष झाला. पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केलेला ‘श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करीं...’ हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग सादर केला अन् यातून सद्गुरूंचे माहात्म्य उलगडले. ‘माझे चित्त तुझे पायीं, राहे ऐसे करी काहीं...’ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग सादर होताच रसिकांनी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम तुकाराम’चा जयघोष झाला.
‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने तर श्री विठ्ठलनामाच्या जयघोषाने सभागृह दुमदुमून गेले. पं. अभ्यंकर यांच्या बहारदार गायकीने रंगलेल्या या अभंगरचनेने रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलीया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद...’ या अभंगरचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण श्री विठ्ठलाची प्राप्ती झाल्यानंतरचा आनंद व्यक्त करणारा हा अभंग आहे.
भक्तीचा - नामस्मरणाचा गजर, टाळ्यांचा कडकडाट अन् भक्तिरंगात रमून गेलेले रसिक... असे वातावरण भक्तिसंध्येत रंगले होते. पं. अभ्यंकर यांच्या गायकीला अन् त्यांना साथ करणार्या कलाकारांना उभे राहून रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या भक्तिसंध्येचा कार्यक्रम रसिकांना एक वेगळाच स्वरानंद देऊन गेला. पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), प्रथमेश तरळकर (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. तर विलीना पात्रा, साईप्रसाद पांचाळ, मुक्ता जोशी आणि रुद्रप्रताप दुबे यांनी स्वरसाथ केली. मंजिरी जोशी यांनी निरुपण केले.