

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह संत मीराबाई आणि शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांच्या अभंगरचनांनी सजलेला ‘स्वरसंजीवन भक्तिसंध्या’ कार्यक्रम आज गुरुवारी (दि. 3 जुलै) रंगणार आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिरचनांनी हा बहारदार कार्यक्रम सजणार असून, सायंकाळी पाच वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. (Latest Pune News)
श्री विठुनामाचा जयघोष... संतांच्या अभंगरचना... भक्तिरंगाने रंगलेले वातावरण अन् आषाढी वारी... असे समीकरण यानिमित्ताने जुळून येणार असून, भक्तिरंगात रंगून जाण्यासाठी रसिकही सज्ज आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. वारी म्हटली की, संतांच्या अभंगांचा भक्तिरंग आलाच... हाच भक्तिरंग, भक्तीचा सोहळा पुण्यात पं. अभ्यंकर यांच्या मधुर वाणीतून अनुभवता येणार आहे. ख्याल गायनाच्या (शास्त्रीय संगीत) कार्यक्रमात शृंगार, विरह, वीर, आनंद, करुण आणि भक्तिरसही सादर केला जातो.
भक्तिसंगीताचा कार्यक्रम भक्ती आणि करुणा, यावर आधारित असतो. त्यामुळे आपोआपच आनंदरसाचीही निर्मिती होत असते. स्वरसंजीवन कार्यक्रमात भक्ती, करुणा आणि आनंद, या तीन रसांचा परिपोष ऐकायला मिळणार आहे. पुनीत बालन ग्रुप हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर आहेत, तर बढेकर डेव्हलपर्स हे सहप्रायोजक आहेत.
याविषयी पं. अभ्यंकर म्हणाले, मी स्वरसंजीवन कार्यक्रमात स्वत: संगीतबद्ध केलेल्या काही संतरचना सादर करणार आहे, या रचना मी विविध रागांमध्ये बांधलेल्या असून, दिवसातल्या सर्व प्रहरांमधल्या रागांवर आधारित या अभंगरचना आहेत. त्यामुळे या रचनांमध्ये वैविध्य आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
1) दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पर्वती - सकाळी 10 ते सायंकाळी 5
2) ग्राहकपेठ, टिळक रस्ता - सकाळी 10 ते सायंकाळी 5
कार्यक्रम कधी: गुरुवारी, 3 जुलै
कुठे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
वेळ: सायंकाळी 6 वाजता