

पुणे: स्वारगेट येथील शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणात आरोपीची शुक्रवारी (दि. 28) रात्री पोटेन्सी टेस्ट (लैंगिक क्षमता चाचणी) करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (दि. 25) सकाळी दत्तात्रय गाडे याने 26 वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता.
त्यामुळे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी पहाटे आरोपीला पुण्यात आणून अटक करण्यात आली. शनिवारी पोलिसांनी आरोपीचा घटनेच्या अनुषंगाने जबाब नोंदविला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
शनिवारी (दि.1) पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवत, त्याचे रक्त, केस डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली. पोलिसांनी ज्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली, ती बस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवत फॉरेन्सिकच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला.
यामध्ये आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणाला आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमकी सत्यता काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.