

पुणे: ‘आपल्या शरीरामध्ये सत्त्व, रज आणि तम, हे तीन गुण आहेत. सत्त्व गुण म्हणजे आपल्या अंगावर शहारा आणणारा अनुभव. भक्तिसंगीतामध्ये सत्त्व गुण हा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यातील अनुभूती तृप्त करणारी असते.
रज आणि तम गुण हे माणसाला कायम कासावीस ठेवतात. पण, भक्तिसंगीतातून निर्माण होणार्या सत्त्व गुणामुळे माणूस शांत आणि तृप्त होतो. भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकल्यावर रसिकांना सत्त्व गुणाचा साक्षात्कार होतो. भक्तिसंगीतातून प्रत्येक जण दिव्यत्वाची अनुभूती अनुभवतो अन् हीच भक्तिरसाची ताकद आहे,’ अशा शब्दांमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांनी भक्तिरसाच्या अनुभूतीचा अर्थ उलगडला. (Latest Pune News)
वैष्णवांचा मेळा लवकरच पंढरीला पोहचेल अन् उसळेल तो भक्तीचा सागर... हाच भक्ती-नामस्मरणाचा गजर पुण्यात ऐकायला मिळणार आहे, तो ‘स्वरसंजीवन’ या संगीतमय भक्तिसंध्येत. दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने गुरुवारी (दि. 3 जुलै) प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या या भक्तिसंध्येचे आयोजन केले असून, हा कार्यक्रम बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे.
त्यानिमित्ताने पं. अभ्यंकर यांच्या मधुरवाणीतून संतांचे ‘भक्तीने ओथंबलेले अभंग’ रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. विविध संतांच्या रचना पं. अभ्यंकर सादर करणार असून, या भक्तिरसाची स्वरानुभूती रसिकांना या भक्तिसंध्येतून घेता येणार आहे. पुनीत बालन ग्रुप हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्हसोसायटी हे कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर आहेत, तर बढेकर डेव्हलपर्स हे सहप्रायोजक आहेत.भक्तिसंध्येच्या निमित्ताने पं. अभ्यंकर यांनी आपला भक्तिसंगीताचा प्रवास मुलाखतीतून बोलका केला.
भक्तिसंगीताकडे तुम्ही कसे वळलात?
उत्तर : ख्याल गायकी हा माझ्या गायकीचा मुख्य पैलू असला, तरी भक्तिसंगीत हा माझ्या गायकीचा स्थायीभाव आहे. कलाकार सर्व प्रकारांमध्ये जरी गात असले, तरी त्यांचा एक स्थायीभाव असतो. ख्याल गायनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी मी भक्तिरचना सादर करतो आणि भक्तिरचना सादर गाणे, हे माझ्यासाठी सहज घडणारी प्रक्रिया आहे. मी जेव्हा भक्तिरचना गातो तेव्हा रसिक भक्तिरंगात न्हाऊन जातात.
भक्तिरचनांना रसिकांकडून मिळणारी दाद ही सुखावून जाते. कार्यक्रमांमध्ये मी मुख्यत्वे ख्याल गायकीलाच महत्त्व देत असलो, तरी कार्यक्रमाचा शेवट हा बर्याचवेळा भक्तिरचनेनेच करतो आणि पूर्णपणे भक्तिसंगीताचे कार्यक्रमही करीतच असतो. भक्तिसंगीताच्या माझ्या कार्यक्रमांनासुद्धा ख्याल गायनाच्या कार्यक्रमांसारखाच भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. माझे भक्तिसंगीताचे 50 हून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. सर्व संतांच्या रचना मी अल्बममध्ये गायल्या आहेत. ख्याल गायकीसाठी मिळालेली दाद ही मला भक्तिरचनांसाठीही मिळाली आहे.
भक्तिरचनांना मिळालेली दाद, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : मी जगभरात 200 हून अधिक निरनिराळ्या शहरांमध्ये ख्याल गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत आणि कार्यक्रमाच्या शेवटी गायल्या जाणार्या माझ्या भक्तिसंगीताच्या रचनांना कायम उत्स्फूर्त दाद मिळत आलेली आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील ‘समर्थवाणी’ आणि ‘ध्यान लागले’ या दोन्ही अल्बमना रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. यातील काही भक्तिगीते रोज सज्जनगडावर वाजवली जातात, ही माझ्या गायकीला मिळालेली मोठी दाद आहे.
कार्यक्रमांसाठी भक्तिरचना तुम्ही कशा निवडता?
उत्तर : भक्तिरचना सादर करण्यापूर्वी संतसाहित्याचा अभ्यास करावा लागतो. संतसाहित्य चाळताना कुठले शब्द हे भावतीलष याला कोणताही नियम नाही. पण, जेव्हा त्या शब्दांना आपल्या स्वत:चीच दाद मिळते, त्या वेळी वाटते की, या भक्तिरचना रसिकांसमोर आपण सादर कराव्यात. कारण, ज्या रचना आपल्या स्वत:च्या मनात घर करून जातात, त्या रसिकांना नक्कीच आवडतात. त्यामुळे मला भावतील त्या भक्तिरचना मी कार्यक्रमांमध्ये सादर करतो. सोप्या शब्दांमध्ये आशय सुरेख पद्धतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे. मी अशा अभंगरचना निवडतो, ज्यात शब्दांचे वैविध्य असते.
संतांच्या भक्तिरचनांबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : संतांनी त्यांच्या देवतांना शरण जाताना आलेले अनुभव जरी वेगवेगळ्या शैलीत अभंगरूपात मांडलेले असले, तरी त्यांचे भक्तीचे अनुभव एकसारखेच आहेत. फक्त अभंगांची भाषाशैली वेगळी आहे. पण, त्यातील भाव मात्र एकच असतो. विविध संतांनी आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे अभंगरचना केलेली आहे आणि त्यात श्री विठ्ठलाची किंवा आपापल्या दैवतांची प्राप्ती झाल्यानंतरच आपापली अनुभूती अभंगांमधून मांडली आहे. या सर्वांत तळमळ ही भावना एकच आहे, फक्त ती व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
आषाढी वारीनिमित्त कार्यक्रमात गातानाची तुमची भावना काय असणार आहे?
उत्तर: पंढरीची वारी हा एक अद्भुत सोहळा आहे. सगळे वारकरी एकाच भावनेने पंढरीच्या वारीला निघतात, ती असते शरण भावना. आपल्यातील अहंकार त्यागाचा आणि त्या दिव्यशक्तीला शरण जायचे, ही त्यामागची भावना असते. सामूहिक शक्ती ही एखादी अशक्यप्राय गोष्टही सत्यात उतरवू शकते. हीच ताकद वारीतही आहे. ही सत्त्वगुणी सामूहिक शक्ती आषाढीला एकत्र येते. याच पंढरीच्या वारीच्या सत्त्वगुणी सामूहिक शक्तीचा जेव्हा मी गायनाच्या माध्यमातून भाग होतो त्या वेळी त्या भक्तीपूर्ण वातावरणाचे मला बळ मिळते. आषाढी वारीत गाताना खूप आनंद मिळतो.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
1) दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पर्वती - सकाळी 10 ते सायंकाळी 5
2) ग्राहकपेठ, टिळक रस्ता - सकाळी 10 ते सायंकाळी 5
कार्यक्रम कधी: गुरुवारी, 3 जुलै
कुठे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
वेळ: सायंकाळी 6 वाजता