

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) अध्यक्षपदी अॅड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे (शिरूर) व उपाध्यक्षपदी मारुती दत्तात्रय जगताप (पुरंदर) यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी आणि सहाय्यक दुग्ध उपनिबंधक सुधीर खंबायत यांनी गुरुवारी (दि.13) दुपारी जाहीर केले.
कात्रज दूध संघाचे यापूर्वीचे अध्यक्ष भगवान पासलकर व उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यामुळे दोन्ही पदाधिकार्यांच्या रिक्त जागेसाठी संघाच्या मुख्यालयात सकाळी अकरा वाजता निवड प्रक्रिया खंबायत यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. अध्यक्षपदासाठी अॅड. ढमढेरे यांच्या नावास सूचक म्हणून शिरूरच्या संचालिका व माजी अध्यक्षा केशरताई पवार तर माजी अध्यक्ष पासलकर यांनी अनुमोदन दिले.
तर जगताप यांचे नाव ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के यांनी सुचविले आणि दिलीप थोपटे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यासी अधिकारी सुधीर खंबायत यांनी दोन्ही पदाधिकार्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
‘कात्रज’चे अध्यक्ष ढमढेरे यांची जल्लोषात मिरवणूक
अॅड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
तळेगाव ढमढेरे येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल उधळत व पेढे भरवून गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. अॅड. स्वप्निल ढमढेरे यांचे त्यांच्या राहत्या घरी तसेच मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले.
जिल्हा दूध संघाचे संचालकपद स्वप्निल ढमढेरे यांचे वडील बाळासाहेब ढमढेरे यांनी 37 वर्षे भूषविले. मात्र, त्यांचे अध्यक्षपदाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न माझ्या माध्यमातून पूर्ण झालेले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व पदाधिकार्यांच्या माध्यमातून मला मिळालेल्या संधीचे सोने करीन. दुग्ध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार व अन्य ज्येष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी माझी केलेली निवड मी चांगले काम करून आणि संघाला आणखी उंचीवर नेऊन सार्थ ठरवीन. माझे वडील बाळासाहेब ढमढेरे यांचे चेअरमन होण्याचे स्वप्न आज माझ्या निवडीमुळे पूर्ण झाल्याने मी आनंदी आहे. दूध व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला सामोरे जाताना संघाच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन कात्रज दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री डिजिटल मार्केटिंगद्वारे वाढविण्यास मी प्राधान्य देणार आहे. शिवाय शेतकर्यांना द्यावयाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यावर माझा भर राहील. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या माध्यमातून (एनडीडीबी) संघाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पास गती देऊन अत्याधुनिक स्वयंचलित प्रकल्पाद्वारे संघाच्या नावलौकिकात मी भर टाकणार आहे.
- अॅड. स्वप्निल ढमढेरे अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ.