
शिरूर : आष्टी -पाटोदा- शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहून जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्याचे काम सुरेश धस हे करत असतात. त्यामुळे त्यांना मोठे जनतेतून प्रेम मिळत आहे. सुरेश धस यांनी जनतेचे प्रेम आणि विश्वास मिळवला आहे यामुळे जनता तर त्यांच्या पाठीशी आहे. सुरेश धस हे प्रत्येकाला आपला माणूस मानतात म्हणून मतदार बांधवांनी ही त्यांना आपला माणूस म्हणून भरघोस मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री तथा आ. पंकजा मुंडे यांनी शिरूर मध्ये केले आहे.
आष्टी -पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा विधान परिषदेच्या आ. पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी मतदार संघातील तीनही तालुक्यातून कार्यकर्त्यांची, मतदार बांधवांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थित मतदार बांधवांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे तोंड भरून कौतुक केले.(Maharashtra assembly poll)
यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, मतदार संघातील केवळ कार्यकर्तेच नाही तर तळागाळातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर राहणारा नेता म्हणून सुरेश धस यांचा मोठा नावलौकिक आहे. सुरेश धस हे २०१७ ला भाजपात आले. तेव्हापासून अण्णाची कार्यपद्धत मला चांगलीच भावून गेली आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटामध्ये सुरेश धस हे सदैव जनतेमध्ये जाऊन त्यांना मदत मिळावी, योग्य ते उपचार मिळावे यासाठी कोविड सेंटर उभारून जनतेची सेवा करत होते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात ते मोठे जागरूक राहून त्यांचे प्रश्न सोडवत असतात . यामुळे सुरेश धस यांनी जनतेचे प्रेमच नव्हे तर मोठा विश्वासही मिळवला आहे. यामुळे त्यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय निश्चित झाला आहे.
आष्टी -पाटोदा -शिरूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी विधानभवनामध्ये वर हात करण्यासाठी सुरेश धस यांना विजयी करावे असे अवाहन माजी मंत्री तथा विधान परिषदचे आ.पंकजा मुंडे यांनी शिरूर येथे केले आहे.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे वरिष्ठनेते चंदूलानी साहू,भाजपा उमेदवार सुरेश धस, ज्येष्ठ नेते विजय गोल्हार, भाजपा नवनिर्वाचित जिल्हध्यक्ष शंकर देशमुख, शिरूरचे नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर, रविराज बडे, फैयाज भाई शेख, रिपाईचे अरुण भालेराव, रासपचे श्याम महानोर,भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश उगलमुगले, रोहित भैया पानसंबळ,संतोष जाधव, बाबुराव केदार, महेंद्र गर्जे, वैजनाथ खेडकर, राहुल चौरे, प्रकाश खेडकर, डॉ. मधुसूदन खेडकर, खरमाटे मामा, शरद ढाकणे आदीसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
मी खासदार व्हावे हे नियतीला मान्य नव्हते, मी आमदारच रहावे आणि तुमच्या सर्वांची सेवा करता यावी, तुमच्या अंतकरणांमध्ये माझं घर असावं यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये नियतीने मला खासदार केलं नाही. मला या समोर बसलेल्या जनतेची सेवा करण्यासाठी या जनतेत पुन्हा पुन्हा जाण्यासाठी आमदार केलं आहे. मी एका मतदारसंघाची आमदार नसून मी राज्यभराची आमदार आहे त्यामुळे मला महाराष्ट्रभरातील सर्व जनतेमध्ये त्यांची सेवा करता येणार असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले.(Maharashtra assembly poll)
आष्टी-पाटोदा -शिरूर मतदार संघातून पंकजा मुंडे यांच्या सभेला कार्यकर्ते, मतदार बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची ही मोठी लक्षणीय गर्दी दिसून आल्याने पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसून येत होता.