भोर: सरकार फक्त विकासकामांचे आश्वासन देण्यात तरबेज आहे. विकासकामांत राजकीय हेतू ठेवत असल्यामुळे त्यांच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते. सरकारने कामे केली तर आंदोलन करावे लागणार नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ब्राह्मणघर (ता. भोर) येथील स्थानिक खासदार निधीतून 20 लाख रुपये मंजूर केलेल्या रस्ता भूमिपूजन समारंभ, नऱ्हे येथील मंदिर पाहणीदरम्यान खा. सुळे बोलत होत्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष रवींद्र बांदल, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, माजी सभापती वंदना धुमाळ, मानसिग धुमाळ, शहराध्यक्ष विठ्ठल शिंदे, पार्थ रावळ, दगडु दामगुडे, अंकुश वीर, नाना वीर, गणेश खुटवड, विलास शिवतरे, राजेश शिंदे, आत्माराम धुमाळ, गोरख धुमाळ, रंजना धुमाळ, मनीषा धुमाळ, प्रकाश धुमाळ, नंदकुमार धुमाळ, जयवंत गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या, लोकसभेप्रमाणे विधानसभेला अपेक्षित यश मिळाले नाही, याची खंत असून आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून पुन्हा ताकदीने उभे राहू. सध्या उन्हाळा वाढला असून पाणीटंचाई वाढली आहे. दुधाला हमीभाव नाही. एसटी बसचा तुटवडा, कामगारांचे पगार थकले आहेत. सरकारने एकमेकांवर ढकलण्यापेक्षा कामगारांना पगार मिळाले पहिजे. बनेश्वरचा रस्ता लवकर होणे गरजेचे असल्याचे खा. सुळे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक रवींद्र बांदल यांनी केले तर आभार अंकुश वीर यांनी मानले.