बारामती : विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. २२) बारामतीतील गोविंदबागेत पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? आम्हाला अक्षदा टाकू द्या, व्यक्तिगत जीवनात आधार लागतो आणि घरातल्याशिवाय दुसरा आधार उपयोगी पडत नसतो, असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली. माझ्या म्हणण्याचा ते (युगेंद्र) गांभिर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
विद्या प्रतिष्ठानची बैठक आटोपल्यानंतर खा. पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत युगेंद्र यांचा वाढदिवस साजरा झाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत न जाता युगेंद्र यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. विधानसभेला तर अजित पवार यांच्या विरुद्धच शड्डू ठोकला होता. युगेंद्र यांच्या वाढदिवसाचा केक गोविंदबागेत कापण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्याने जोरदार हशा पिकला. व्यक्तिगत जीवनात आधार लागतो घरातल्याशिवाय दुसरा आधार उपयोगी पडत नसतो, त्याचा विचार गांभीर्याने करतील अशा कोपरखळ्या पवार यांनी मारल्या.
उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलताना पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून युगेंद्रने तुम्हा लोकांसोबत कामाची सुरुवात केली. लोकांशी विनम्रतेने बोलण्याचा त्याचा स्वभाव आहे. सुसंवाद ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हा लोकांनी युगेंद्रची तुलना करता कामा नये. मी असो किंवा अजित असो, आम्ही राजकारणात जेव्हा होतो तेव्हा सरकार आमच्या हातात होते. आज युगेंद्र काम करत असताना सरकार हातात नाही. पण कष्ट करायचे, माणुसकीचे संबंध ठेवायचे. लोकांशी संपर्क वाढवायचा हे त्यांचे सूत्र आहे. तुम्हा सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. सत्तेची अपेक्षा आज तरी आपण करता कामा नये, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत.
गोविंदबागेतील कार्यक्रमापूर्वी विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक पार पडली. खा. शरद पवार, खा. सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत खा. सुनेत्रा पवार यांनी पुतण्या युगेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्याचे देखील दिसून आले. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र यांनी निवडणूक लढवली होती. कुटुंबामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी हास्यविनोदात काकी-पुतण्यात संवाद झाल्याचे पाहायला मिळाले.