बारामती: मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्ज निधीतून मुस्लिम समाजाने उद्योग-व्यवसायात भरारी घ्यावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. बारामतीतील राष्ट्रवादी भवनात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे धनादेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या वेळी महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, संचालक सलीम सारंग, कार्यकारी संचालक गफार मगदूम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अविनाश बांदल, महिलाध्यक्षा अनिता गायकवाड, बारामती बँकेचे संचालक अॅड. शिरीष कुलकर्णी, दिलीप ढवाण, नितीन शेंडे, तैनूर शेख, माजी नगरसेविका अनिता जगताप, सविता जाधव, यास्मीन बागवान आदी उपस्थित होते.
खासदार पवार म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून बारामतीत छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाखांची रक्कम मिळाली आहे. यातून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. या रकमेचा योग्यरीत्या वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी. हा निधी गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद व एकता ग्रुपने घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले.
अंतुले म्हणाले, जिल्ह्यातून जेवढे प्रस्ताव महामंडळाकडे येतात तेवढे इतर जिल्ह्यांतून येत नाहीत. या योजनेसाठी मोलाचे सहकार्य करणार्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार खासदार पवार यांच्या हस्ते पार पडला. प्रास्ताविक अल्ताफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन कमरुद्दीन सय्यद यांनी केले. सुभान कुरेशी यांनी आभार मानले.