

पुणे: राज्यात यंदाच्या 2024-25 या उन्हाळी हंगामात पिकांखालील सरासरी क्षेत्र 3 लाख 49 हजार 759 हेक्टरइतके आहे. सध्या त्यापेक्षा अधिक म्हणजे 4 लाख 5 हजार 341 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 116 टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. तसेच बहुतांश पिकांच्या सरासरी क्षेत्रांहून अधिक पेरण्या पूर्ण झालेल्या असल्याने पिकांच्या उत्पादनातही वाढ होण्याचा कृषी आयुक्तालयाचा अंदाज आहे.
गतवर्षी उन्हाळी हंगाम 2023-24 मध्ये 24 मार्च अखेर उन्हाळी पिकांच्या पेरण्या सुमारे 2 लाख 98 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर झाल्या होत्या. कारण दुष्काळी स्थितीमुळे पाणी उपलब्धता कमी राहून पेरण्यांखालील क्षेत्रात घट झाली होती. तुलनेने यंदा पाणी उपलब्धता चांगली असल्याने गतवर्षीच्या तुलनेत पेरण्यांचा टक्का निश्चितच समाधानकारक आहे.
तृणधान्ये पिकांखालील सरासरी क्षेत्र 1 लाख 99 हजार 925 हेक्टरइतके आहे. तर प्रत्यक्षात 2 लाख 74 हजार 22 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 137 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये उन्हाळी भात, मका, बाजरीच्या पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी बाजरी घेण्याचे प्रमाण अलिकडील काही वर्षात वाढत आहे. शिवाय पाणी उपलब्धता चांगली असल्याने उत्पादनही यंदा चांगले हाती येण्याची अपेक्षा कृषी विभागातून वर्तविण्यात आली.
राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा, विहिरी, तलावांमध्ये पाणी उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके घेतली असून बहुतांशी पिकांच्या पेरण्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच काही भागात पाणी उपलब्धता कमी असूनही शेतकर्यांनी सूक्ष्म सिंचनाच्या वापर करुन पिके घेतली आहेत. त्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा उन्हाळी पिकांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल.
- वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.