

पुणे: राज्यात 27 मार्चअखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार, 80.06 लाख मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. एकूण 200 पैकी 189 कारखान्यांची धुराडी ऊस संपल्याने बंद झाली आहेत. सध्या जेमतेम 11 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी साखरेचे 107.74 लाख मे. टन झालेले साखर उत्पादन पाहता यंदा 27.68 लाख मेट्रिक टनाने साखर उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयाचा ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात चालू वर्ष 2024-25 मध्ये 904 ते 1013 लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप होण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज होता. मंत्री समितीच्या बैठकीतही त्यावर अहवाल सादर करण्यात आला होता. तसेच इथेनॉलकडे सुमारे 10 लाख टन साखर जाऊन साखरेचे 92 ते 104 लाख मेट्रिक टनाइतके उत्पादन हाती येण्याची अपेक्षा होती, साखर उतारा 10.23 टक्क्यांइतका मिळणे गृहित धरण्यात आले होते. एकूणच ऊस गाळपाचा अचूक अंदाज वारंवार चुकत असल्याचे समोर येत आहे.
मिटकॉन संस्थेचाही अंदाज चुकला
साखर आयुक्तालयाने मिटकॉन या संस्थेबरोबर अचूक ऊस गाळप व साखर उत्पादन अंदाजासाठी सामंजस्य करार केला होता. त्यांच्या अंदाजानुसार, हंगाम 2024-25 साठी 13.72 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्धता होती. एकूण ऊस गाळप 1 हजार 235 लाख मेट्रिक टन अपेक्षित धरले, तरी 10 टक्के ऊस बेणं, चारा, रसवंती, गूळ-खांडसरीसाठी जाऊनही 1 हजार 13 लाख मेट्रिक टन, त्यात 10 लाख मे. टन साखर इथेनॉलसाठी वापरली गेली तरी 103 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन हाती येईल, असा मिटकॉनचा अंदाज होता. पंरतु त्यांचाही अंदाज चुकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.