साठेबाजांमुळे साखर दर चढेच राहणार!

साठेबाजांमुळे साखर दर चढेच राहणार!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने जून महिन्यासाठी 25 लाख 50 हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कोटा वाजवी असूनही साठेबाजांमुळे साखरेचे दर तेजीत राहण्याचा अंदाज बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे. साठेबाजांची साखर व्यापारात वाढलेली सक्रियता हेच दर तेजीत राहण्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राने मे महिन्यासाठी 27 लाख 50 हजार टन इतका मुबलक कोटा घोषित केला होता. त्यामुळे कोटा घोषित होताच दरात क्विंटलला पन्नास रुपयांनी घसरण पाहावयास मिळाली होती. मात्र, ही घसरण तात्पुरती ठरून दर पुन्हा तेजीकडे झुकले. कारण, साठेबाजांच्या वाढलेल्या सक्रियतेमुळे साखरेचे दर पुन्हा वाढले.

जून महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेला 25.50 लाख टन इतका साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत योग्य असल्याचा सूर घाऊक बाजारपेठेतून आळविण्यात येत आहे. मात्र, साठेबाजांची तेजीची धारणा आणि त्यांची बाजारावर असलेली घट्ट पकड, यामुळे दरावर कोणताच फरक मंगळवारी पडला नाही. याबाबत माहिती देताना व्यापारी म्हणाले की, जून महिना म्हटले की शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश, वह्या-पुस्तके, गणवेश खरेदीवर खर्च अधिक होतो. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची खरेदी रोडावते, तसेच जून महिना असल्याने पावसामुळेही मागणी कमी राहते. अशा स्थितीत साखरेचे दर स्थिरावणे अपेक्षित आहे.

मात्र, साठेबाजांच्या सक्रियतेमुळे दरात कोणताही बदल झाला नाही. एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3900 ते 3950 रुपयांवर स्थिरच होता. 1 जूनपासून नवीन कोट्यातील साखरेच्या निविदा निघतील. त्या वेळी नेमकी स्थिती समोर येईल. दरम्यान, कारखान्यांवर साखरेच्या निविदा क्विंटलला 3580 ते 3600 रुपये दराने जात आहेत. त्यावर पाच टक्के जीएसटी कर आणि अन्य खर्चाचा समावेश राहतो, तर किरकोळ बाजारात साखरेची प्रतिकिलोची विक्री 40 रुपये दराने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news