

पुणे: सकाळी... सकाळी चहासाठी लागणारी साखर. या साखरेची रेल्वेच्या पुणे विभागातून देशभरात वाहतूक केली जात आहे. यंदा या वाहतुकीमध्ये तब्बल 32 टक्क्यांनी वाढ झाली असून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 442 रेल्वेचे रेक विभागातून विविध राज्यातील शहरांमध्ये पाठवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 335 रेक साखर वाहतूक करण्यात आली होती, यंदा यात वाढ झाल्याचे समोर आले आहे.
पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली हे मालवाहतूक महसूल लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले आहे.
रेल्वेच्या पुणे विभागातील बारामती, सांगली, कोल्हापूर, कराड या स्थानकांवरून बंगाल, बिहार, मुंबईसह देशातील विविध भागांत साखर पाठवली जाते. यंदाही या भागातून मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात करण्यात आली. त्यातून गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
मळईचीही वाहतूक
पुणे विभागाने मळईला नवीन मालवाहतूक प्रवाह म्हणून यशस्वीरीत्या सुरू केले आहे. आता मिरज, श्रीगोंदा, बेलापूर आणि कराड येथून मनमदुराई जं., चिपुरुपल्ले, तिरुचिरापल्ली, नेल्लैकुप्पम येथे मळई लोड केली जात आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण 24 रॅक लोड केले गेले आहेत. त्यातून 15.15 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला.
पुणे विभाग भविष्यातही याच गतीने कार्य करत राहणार असून, महसूलवाढीच्या द़ृष्टीने अधिक मजबूत पावले उचलणार आहे, जेणेकरून भारतीय रेल्वेच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावता येईल. या आर्थिक वर्षासाठी 506.80 कोटींचे लक्ष्य ठरविले होते आणि पुणे विभागाने 3.4 टक्के अधिक महसूल मिळवत 524.14 कोटींचा टप्पा गाठला आहे, तोही आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच. तसेच, साखर वाहतुकीत यंदाच्या आर्थिक वर्षात 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग