

आशीष देशमुख
पुणे: हवेचे दाब सतत बदलत असल्याने गेल्या काही दिवसांपासून पाऊसमान लहरी बनले आहे. जे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. त्याच्या अगदी उलट परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे हे अलर्ट देताना शास्त्रज्ञांची दमछाक होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान जुलैचा शेवटचा आठवडा अन् ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
सध्या राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे, याचे प्रमुख कारण वाढलेले हवेचे दाब. पाऊस हा प्रामुख्याने मान्सून काळात वार्याची दिशा अन् हवेच्या दाबावर अवलंबून असतो. समुद्र आणि जमिनीवर हवेचे दाब समान असतील तर पाऊस पडण्यात अडचण येते, कारण वारे वाहत नाही. वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने वाहतात. (Latest Pune News)
त्यामुळे जमिनीकडे जास्त दाब झाले की, तिकडे पाऊस पडत नाही. सध्या अशीच स्थिती राज्यात तयार झाल्याने पाऊसमान लहरी बनले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी जे अलर्ट काही तांसापूर्वी दिलेले असतात ती स्थिती काही मिनिटांत बदलत आहे. त्यामुळे जेथे पावसाचा अंदाज नाही अशा भागातही पाऊस पडत असल्याचे दिसून येत असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
हवेचे दाब आणि पावसाचा काय संबंध?
वार्याची दिशा आणि हवेचे दाब हे दोन महत्त्वाचे घटक चांगल्या पावसासाठी गरजेचे असतात. दाब जिकडे कमी त्या दिशेने वारे वाहून ते पाऊस देतात. हवेचा दाब हा बॅरोमिटर या यंत्राने मोजतात. अलीकडे ही यंत्रणा डिजिटल झाली आहे.
समुद्रसपाटी आणि जमीन असा दोन्हीकडे हा दाब मोजला जातो. वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. हवेचे दाब जमीन आणि समुद्रसपाटीवर समान झाले की वार्याचा वेग कमी होतो. परिणामी पाऊस कमी पडतो. त्यामुळे जेथे कमी दाब तेथे पाऊस असे हे गणित आहे. दाब हेक्टापास्कल (एचपीए) किंवा मिलीबार (एम.बी.) या एककात मोजला जातो.
शनिवारपर्यंत कुठे कसा पाऊस...
कोकणः हलका ते मध्यम (10 ते 25 मि.मी.)
मध्य महाराष्ट्र: हलका (3 ते 15 मि.मी.)
मराठवाडा: हलका 3 ते 15 मि.मी.)
विदर्भः मध्यम (10 ते 35 मि.मी.)
सध्या कुठे किती दाब (एचपीए)
कोकणः1004 ते 1006
मध्यमहाराष्ट्रः 1002 ते 1004
मराठवाडा: 1000 ते 1003
विदर्भः 998 ते 1002
घाटमाथाः 1003 ते 1006
सध्या राज्यात हवेचे दाब एकसारखे नाहीत आणि ते सतत बदलत आहेत. कोकण, मध्य, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे अशी स्थिती होत आहे. सध्या राज्यात हवेचे दाब सरासरी 1005 ते 1004 हेक्टापास्कल इतके आहेत. त्यामुळे बहुतांश भागात पाऊस कमी आहे. मात्र जेव्हा ते 1002 च्या जवळ जातात तेव्हा थोडा पाऊस पडतो आहे. दाब वाढले की पाऊस थांबतो आहे. मात्र जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टचा पहिला आठवडा चांगल्या पावसाचा दिसत आहे. या काळात हवेचे दाब अनुकूल होत आहेत. त्यामुळे राज्यातील 130 दुष्काळी तालुक्यांत चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.
-डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ज्ञ.