पिंपरखेड: योग्य व्यवस्थापनाद्वारे प्रतिकूल वातावरणात विविध समस्यांवर मात करत काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथील शेतकरी रूपेश रामदास दिघे आणि नवनाथ बबन दिघे यांनी 15 एकर केळी बागेमध्ये ठिबक व मल्चिंग या आधुनिक तंत्राचा वापर करत कलिंगडाचे आंतरपीक घेतले. या प्रयोगातून तब्बल 250 टनाचे यशस्वी उत्पादन घेत संपूर्ण केळी पिकाचा उत्पादन खर्च वसूल करून परिसरातील शेतकर्यांसमोर आंतरपीक शेतीचा एक आदर्श निर्माण केला आहे.
रूपेश व नवनाथ या दोघांनी मिळून एकूण 15 एकर जमिनीत ठिबक, मल्चिंगचा वापर करत बेडवर 8 जानेवारीला केळी रोपांची लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी हंगामात कलिंगडाची लागवड केली.
ठिबक सिंचनच्या माध्यमातून योग्य खत, पाणी व्यवस्थापन व वाढत्या तापमानातील समस्यावर योग्य औषध फवारणीद्वारे मात केली. त्यामुळे कलिंगड लागवडीपासून 60 दिवसांत काढणीला आले आहेत. तसेच केळीची वाढही चांगल्या पद्धतीने झाली असल्याचे रूपेश आणि नवनाथ यांनी सांगितले.
एकरी 20 टनापर्यंत उत्पादन मिळाले
कलिंगड 11 रुपये प्रतिकिलो दराने शेतातच जागेवर दिल्याने काढणी, वाहतूक, विक्री या खर्चाची बचत झाली. सध्या कलिंगड काढणी चालू आहे. आतापर्यंत 250 टन कलिंगडाची तोड झाली. यातून एकरी 20 टनापर्यंत उत्पादन मिळाले. संपूर्ण केळीचा उत्पादन खर्च कलिंगडातून निघाल्यामुळे केळी पीक पूर्णपणे नफ्यात राहिले.
आंतरपिकामुळे केळीला कुठलाही अतिरिक्त त्रास न होता फायदा झाला आहे. केळीची भरपूर वाढ झाली आहे. केळी आणि कलिंगड या दोन्ही पिकाला रूपेश रामदास दिघे आणि त्यांचे बंधु प्रकाश रामदास दिघे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
- नवनाथ बबन दिघे, शेतकरी, काठापूर खुर्द.