परतीच्या ठेवीच्या नूतनीकरणाचा विषय नामंजूर

‘सोमेश्वर’च्या सभेत डिस्टिलरी विस्तारवाढीस मंजुरी; शिक्षण निधीकपातीचा प्रस्ताव रद्द
someshwar sugar factory
सोमेश्वर सहकारी साखर कारखानाPudhari
Published on
Updated on

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सन 2018-19 या हंगामातील कपात केलेली परतीची ठेव नूतनीकरण करण्याचा ठराव सभासदांनी फेटाळला. त्याऐवजी डिस्टिलरी विस्तारवाढ करण्यासाठी चालू बिलातून प्रतिटन 150 रुपये दहा टक्के व्याजाने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 24 कोटी ठेव विमोचन निधी डिस्टिलरीसाठी वर्ग करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. गेल्या हंगामातील ऊसबिलातून भागविकास निधी योजनेअंतर्गत शिक्षण निधीकपात करण्याचा विषयसुद्धा एकमताने रद्द करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखालील कारखान्याची वार्षिक सभा गुरुवारी (दि. 26) सुमारे नऊ तास सुरू होती. रात्री दहाच्या सुमारास सभा संपली. मंगल कार्यालय बांधणे, सभासदांना दिवाळीसाठी 30 किलो साखर देणे, डिस्टिलरी विस्तारवाढ करणे, या निर्णयाला सभेने परवानगी दिली. जगताप म्हणाले, विस्तारवाढीने कारखान्याची गाळपक्षमता साडेसात हजार टन झाली आहे. त्यासाठी 70 कोटी खर्च आला. 49 कोटी जिल्हा बँकेचे कर्ज व 24 कोटी स्वनिधी उभारण्यात आला. यासाठी दोनशे रुपये ठेव ठेवली आहे. प्रकल्पासाठी स्वनिधी कुठून आणायचा? वाढाव्यातून 15 कोटी ठेव विमोचन निधी परत ठेवतो, त्याची तरतूद म्हणून हे पैसे ठेवले. नफ्यातून दीड कोटी कर भरावा लागतो. प्रकल्प निधी नको, ठेव विमोचन निधी नको, डिस्टिलरी वाढवावी, असा माझा आग्रह नाही. किंमत चढउतार निधीची तरतूद ऊसभावात भर घालण्यासाठी असते.

विजयकुमार सोरटे, प्रकाश जगताप, सतीश काकडे, प्रमोद काकडे यांनी सुरुवातीला 125 रुपये कपात व त्यावर बारा टक्के व्याज देण्याची मागणी केली. सोरटे यांनी 150 रुपये कपात करावेत, हा मुद्दा लावून धरला. यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी 150 रुपये कपात करून दहा टक्के व्याज जिल्हा बँकेप्रमाणे असावे ,अशी भूमिका मांडली. सभासदांनी वेगवेगळी नावे ठेवून निधी वर्ग केला जात आहे, यावर आक्षेप घेतला. डिस्टिलरीची विस्तारवाढ झाली पाहिजे. पण, परतीची ठेव परत द्यावी, अशी मागणी केली. ठेव विमोचन निधीकपातीचा पायंडा संस्थाहिताचा नाही, असे मत सभासदांनी व्यक्त केले.

चर्चेत अ‍ॅड. बाळासाहेब गायकवाड, कांचन निगडे, शिवाजी शेंडकर, शंकर दडस, विराज मदने, दत्तात्रय भोईटे, हर्षद होळकर, शिवराज चव्हाण, कांचन निगडे, दत्ताआबा चव्हाण, राजेंद्र जगताप, केतन भोसले, दिलीप खैरे, दिलीप फरांदे, बाळासाहेब गायकवाड, मदन काकडे, ज्येष्ठ सभासद विजयकुमार सोरटे, माजी सभापती प्रमोद काकडे आदींनी भाग घेतला.

कारखान्यावर 117 कोटींचे कर्ज

सोमेश्वर कारखाना सर्व कर्ज वेळेत परतफेड करीत आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे 72 कोटी, विस्तारवाढीचे 35 कोटी, आत्मनिर्भर योजनेचे साडेसात कोटी आणि कामगार वसाहतीचे दोन कोटी पस्तीस लाख, असे कारखान्यावर 117 कोटी मध्यम मुदतीचे कर्ज असल्याचा खुलासा अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news