

येरवडा : विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याने त्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (दि. 25) येरवड्यातील अग्रसेन विद्यालयात घडला. याचा विरोध करण्यासाठी शिवसेनेने विद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, धनंजय बाराथे, सुहास कांबळे, सनी पवार, किसन दर्बी, इलियास शेख, पप्पू चव्हाण, संतोष शेळके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होऊन नऊ दिवस झाले. विद्यालयाकडून फीची मागणी पहिल्या दिवसापासून करण्यात आली. साधारण 40 विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याने वर्गात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर खाली बसवून ठेवण्यात येत होते. पण, आज काही विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर घरी पाठवून देण्यात आले. ही माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, पालक आणि पदाधिकारी यांचीशी चर्चा करण्यात आली. फीसंदर्भात शाळा प्रशासनाने पालकांबरोबर समुपदेशनाने मार्ग काढावा, असे गोयल यांच्याकडून सुचविण्यात आले. तसेच, सहा जणांची कमिटी स्थापन करा, यामध्ये एक संचालक मंडळातील सदस्य, दोन शाळा प्रशासनाचे अधिकारी तसेच पालक संघांचे प्रतिनिधी घेत कमिटी तयार करा, यांच्यामार्फत फीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा, तसेच एखादा आर्थिक दुर्मीळ विद्यार्थी असल्यास मदत करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले.
विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, तर संस्था चालणार कशी?
राधेश्याम अग्रवाल, अध्यक्ष
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर संख यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्यास तीव— आंदोलनाचा इशारा आनंदगोयल यांनी दिला.
मागील महिन्यात 10 हजार भरले आहेत, पुढचीही फी भरण्यासाठी काहीसा वेळ देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. 28 हजार भरणार असतील तर शाळेत मुलीला घेणार; अन्यथा पाठवू नका, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदाशिव साळवे, पालक