

पुणे: व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देताना अनेक अडचणी येतात. यासाठी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षांसाठी यावर्षी प्रथमच 18 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या परीक्षेसाठी अव्वाच्या सव्वा फी घेतली जात आहे. या मॉक टेस्टसाठी 500 रुपये शुल्क अधिक 90 रुपये जीएसटी,असे एकूण 590 रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे मॉक टेस्टसाठी विद्यार्थ्यांवर आर्थिक भूर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.
एमएचटी सीईटी अंतर्गत विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 17 ते 18 लाखांच्या घरात आहे. या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जर मॉक टेस्ट परीक्षेसाठी सहाशे रुपये घेतले जात असेल, तर त्यातून कोटींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे सीईटी सेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी की लुटीसाठी काम करत का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना पाच परीक्षा दिल्या जातील.
मॉक टेस्टमध्ये घेण्यात येणार्या पाच परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत होईल आणि परीक्षेतील प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा अंदाज येईल. हा मूळ उद्देश बाजूला राहिला असून, यातील अर्थकारण समोर आले आहे.
ज्या एजन्सीकडून प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जात असेल, त्याच एजन्सीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून मॉक टेस्ट घेणे उचित ठरणार नाही. कारण संबंधित एजन्सीकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे आणि आणि त्या गुणांवरूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश दिले जाते, अशा एजन्सीने शुल्क आकारून मॉक टेस्ट घेतल्यास पुढील काळात संबंधित एजन्सीच्या विश्वासाहर्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणतात इच्छुक परीक्षार्थी ?
सीईटी सेल फक्त विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्यासाठी तयार झालेले दिसतेय. सीईटीसाठी पैसे भरलेले असताना आता मॉक टेस्टसाठी 590 रुपये मागितले जात आहेत. अजून कॅप राऊंड, प्रवेश निश्चितीसाठीदेखील पैसे भरावे लागतील. म्हणजे फक्त सीईटीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित होईपर्यंतच तीन - साडेतीन हजार रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी द्यावे लागणार आहेत.
नीट, जेईईसारख्या परीक्षा होताना विद्यार्थ्यांना शासनाकडून फ—ी मॉक टेस्ट देण्याची संधी दिली जाते. मग महाराष्ट्राच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांना एवढे पैसे का द्यावे लागतात ? आम्ही मॉक टेस्ट दिली नाही आणि त्यातलेच प्रश्न जर मुख्य परीक्षेत आले तर 590 रुपये न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भीती आहे.