

पुणे : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजने’संदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला असून, पुढील तीन वर्षांसाठी इन्श्युरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा योजना आता अनिवार्य करण्यात आली आहे. याआधी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची होती.
ज्या विद्यापीठांकडे कमी हप्त्यात अधिक संरक्षण देणारी स्वतंत्र विमा योजना आधीपासून कार्यरत असेल, त्या विद्यापीठांना संबंधित योजना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, यासाठी संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांची पूर्वसंमती आवश्यक राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पुढील तीन वर्षांसाठी इन्श्युरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील पुढील कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असून, त्यांचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.