पिकांसाठी ‘उजनी’काठच्या शेतकर्‍यांची धडपड; स्वखर्चाने पाणी मिळवण्याचा प्रयत्न

पिकांसाठी ‘उजनी’काठच्या शेतकर्‍यांची धडपड; स्वखर्चाने पाणी मिळवण्याचा प्रयत्न

कालठण : पुढारी वृत्तसेवा : राज्यात बहुतेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे. उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) काठच्या परिसरालाही दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. येथील शेतकर्‍यांनी जीवापाड जपलेला ऊस, कांदा, केळी ही पिके हाता-तोंडाशी येत असतानाच पाण्याच्या टंचाईमुळे निम्म्याहून अधिक पिके जळून गेली आहेत. तर उरलेली पिके जगवण्यासाठी व पाणी मिळवण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसून येत आहेत.

उजनी धरणाचा लाभक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंदापूर तालुक्यातील कांदलगाव ते भिगवण हा पट्टा ऊस व केळी बागायतीसाठी प्रसिध्द आहे. यामध्ये कांदलगाव, हिंगणगाव, शहा, पडस्थळ, माळवाडी, शिरसोडी, अजोती, कालठण नंबर 1 व 2, गलांडवाडी, राजवडी, कळाशी, गंगावळण, अगोती 1, 2, 3, चांडगाव, पळसदेव, डाळज, भिगवण या गावांचा समावेश आहे. मात्र अलीकडील काळात उजनीच्या पाण्याला अनेक वाटेकरी निर्माण झाले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी पातळी नेहमीपेक्षा 5 ते 6 किलोमीटर लांब जात आहे. त्यामुळे वीजपंपांसाठी इतक्या दूरपर्यंत वीजपुरवठा करणे शक्य होत नाही. तसेच पाइपलाइन करणे देखील अशक्यप्राय बनते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गणी करून पोकलेनच्या साहाय्याने साधारणतः 20 ते 30 फूट रुंदीच्या आणि 15 ते 20 फूट खोलीच्या चार्‍या पाडून वीजपंपांपर्यंत पाणी आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

पाण्याअभावी याआधीच जवळपास 50 टक्के पिके करपून गेली आहेत. त्यात काल-परवा झालेल्या वादळी वार्‍याने ऊस, केळी, कांदा पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यावरही उमेद न सोडता या भागातील शेतकरी चार्‍यातून आणलेले पाणी पिकांपर्यंत पोहचवण्यासाठी दिवसभर पाईप, स्टार्टर, केबल आदींची जुळवाजुळव करत आहेत. कालठण नंबर 1 परिसरात तर नदीतून चारीत पाणी सोडून ते पुन्हा उचलून पिके वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिरसोडी, माळवाडी, पळसदेव, राजवडी या भागात व कॅनालप्रमाणे मोठ्या चार्‍या खोदून शेतीला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता चार्‍या बंद पडल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके जळताना पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही.

'उजनी'च्या 'मायनस' पातळीचे ऐतिहासिक रेकॉर्ड

उजनी धरणातून सोलापूरसाठी शुक्रवार, दि. 10 मेपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पाणीपातळी झपाट्याने खालावत चालली आहे. धरणाची पाणीपातळी मायनस (-उणे) -57 ते -58 टक्क्यांपर्यंत खाली जाणार आहे. मे अखेरपर्यंत पाणीपातळी मायनस (- उणे) 60 टक्के होणार हे निश्चित आहे. यापूर्वी दि. 30 जून 2018 रोजी उजनी धरणाची पाणीपातळी मायनस (-उणे) -59.43 टक्क्यांपर्यंत गेलेली होती. परंतु नंतर झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली होती. धरणाच्या मागील 43 वर्षांच्या इतिहासात मे अखेरपर्यंत एवढ्या नीच्चांकी मायनस (-उणे) पातळीत उजनी धरण जाण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news