

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : इनामगाव (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर मंदिर देवस्थान हे 'क' वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. अखेर 'क' वर्ग तीर्थक्षेत्राची मागणी पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमांडपंती असून, मंदिरातील अतिप्राचीन पूर्व-पश्चिम स्थापित दुर्मीळ असे 'शिवलिंग' आहे. तसेच दक्षिण वाहिनी घोड नदीच्या पवित्र तीरावर स्थापित मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वर्षभर लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
गेल्या अनेक दिवसांपासून 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दिवंगत माजी खासदार गिरीश बापट, दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार अशोक पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी केली होती. सध्या मंदिराच्या प्रांगणात विविध शासकीय योजना तसेच ग्रामपंचायत व लोकसहभागातून विकासकामे सुरू आहेत. 'क' वर्ग तीर्थक्षेत्राची मागणी पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे माजी सरपंच पल्लवी घाटगे यांनी सांगितले.
मंदिरालगत विविध प्रकारची झाडे लावली आहेत.
पेव्हिंग ब्लॉक, काँक्रिटीकरणही केले आहे. स्मशानभूमी, पूलबांधणी, अंतर्गत विद्युतीकरण, संरक्षित भिंत, ओढा खोलीकरण आदी कामे झाली आहेत, असे वृक्षमित्र प्रदीप निंबाळकर यांनी सांगितले. घोड नदीतीरावर सन 1967 ते 1982 च्या कालखंडात उत्खनन झाले. वसाहतीचे अवशेष, मातीची भांडी, हत्यारे, अवजारे या ठिकाणी आढळली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पहिल्या शेतीला कालव्यातून पाणी देण्याची पद्धत, स्वस्तिक कला आदी येथे मिळून आले. त्यामुळेच इनामगावला अभ्यासकांच्या दृष्टीने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे, असे तुकाराम मचाले यांनी सांगितले.
उपसरपंच सुरज मचाले, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, मंगल मस्के, तात्यासाहेब मचाले, शिवाजी मचाले, गणेश लोणकर, संजय घाटगे, अमोल राऊत, अभिजित मचाले, शांताराम मनवरे आदी या वेळी उपस्थित होते.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामगावला भविष्यात अभ्यासकदृष्टीने आणि पर्यटक, भाविकसंख्या वाढून रोजगारनिर्मिती होईल. तसेच ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर देवस्थान हे 'क' वर्ग तीर्थक्षेत्र व्हावे, यासाठी सातत्याने दैनिक 'पुढारी'ने देखील सातत्याने आवाज उठविला आहे.
– अनुराधा घाडगे, सरपंच, इनामगाव
हेही वाचा