देहूगाव: श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 16) देहूनगरीत लाखो वारकरी भाविक दाखल झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या दिंड्या, हरिनामाचा गजर, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि टाळ मृदंगाचा गजर यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. बीज सोहळ्यानिमित्त देहूतील मुख्य मंदिरावर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
रविवारी (दि. 16) बीज सोहळादिनी श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात पहाटे 3 वाजता काकड आरती, पहाटे 4 वाजता श्री संत तुकाराम महाराज महापूजा व श्रींची महापूजा देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथे पूजा होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखीतून वैकुंठगमन मंदिराकडे हरिनामाच्या गजरात मार्गस्थ होतील. श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ सोहळ्यानिमित्त ह.भ.प. देहूकर महाराज मोरे यांचे सकाळी दहा वाजता कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता हरिनामाच्या गजरात वारकरी, भाविक-भक्त नांदुरकीच्या वृक्षावर तुळशी आणि पुष्पांचा वर्षाव करून हा बीज सोहळा अनुभवतील.
त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी 2 वाजता मुख्य मंदिरात येऊन दाखल होईल. त्या ठिकाणी देहू देवस्थानच्या वतीने वारकरी, दिंडीकरी, विणेकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.नगरपंचायतीकडून भाविकांचे स्वागत देहू नगरपंचायतीच्या वतीने वारकरी, भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, अखंडित वीजपुरवठा, प्राथमिक उपचार केंद्र, इंद्रायणी घाट, मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर व परिसरात स्वच्छता अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर, या बीज सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, तालुका व स्थानिक प्रशासनाच्या वतीने वारकरी, भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.