Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'मध्ये पुरुषोत्तम जगतापांचा दारुण पराभव! ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग

१३ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम जगतापांना मतदारांनी नाकारले!
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'मध्ये पुरुषोत्तम जगतापांचा दारुण पराभव! ३५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग
Published on: 
Updated on: 

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 'लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनल'चे प्रमुख आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मतदारांनी त्यांच्या पॅनलला स्पष्टपणे नाकारत कारखान्यात सत्तांतराचा कौल दिला. विशेष म्हणजे, जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, सुदाम इंगळे आणि माणिक झेंडे यांनाही मतदारांनी सपशेल नाकारले. त्यामुळे या निकालाने सोमेश्वरच्या राजकारणात जगताप यांच्या नेतृत्वाला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे.

पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलची प्रमुख भिस्त पुरंदर तालुक्यातील मतदारांवर होती; मात्र या बालेकिल्ल्यातही मतदारांनी त्यांच्या पारड्यात मते टाकली नाहीत. बारामतीसह पुरंदरमधील मतदारांनी दिलेला हा कौल जगताप गटासाठी अनपेक्षित मानला जात आहे. पुरुषोत्तम जगताप यांनी तब्बल ३५ वर्षे संचालक म्हणून, तर त्यातील १३ वर्षे अध्यक्ष म्हणून कारखान्याची धुरा सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात सोमेश्वर कारखान्याने राज्यभरात नावलौकिक मिळवला, १३ मानाचे पुरस्कार पटकावले आणि ऊस उत्पादकांना राज्यातील उच्चांकी दर देण्याची परंपराही कायम ठेवली.

दीर्घ अनुभव, कारखान्याच्या प्रगतीतील भरीव योगदान आणि पुरस्कारांची परंपरा अशी भक्कम जमेची बाजू असतानाही जगताप यांना मतदारांचा विश्वास संपादन करता आला नाही. या निवडणुकीत विकासकामे, प्रदीर्घ अनुभव आणि राजकीय वजन यांपेक्षा सभासदांनी बदलाच्या बाजूने दिलेला कौल अधिक निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकीकडे कारखान्याला यशाच्या शिखरावर नेणारे नेतृत्व आणि दुसरीकडे मतदारांनी दाखवलेला घरचा रस्ता, अशी विरोधाभासी स्थिती या निवडणुकीत समोर आली. जगताप यांच्यासह त्यांच्या प्रमुख शिलेदारांचा झालेला हा पराभव सोमेश्वरच्या सहकारातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ठरला आहे. आता या मोठ्या धक्क्यानंतर पुरुषोत्तम जगताप कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news