Solar Pump: सौर कृषी पंप योजनेत शेतकर्यांची लूट सुरूच
टाकळी हाजी: टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील शेतकर्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यासाठी एजन्सीकडून अतिरिक्त खर्च करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू आहे. याबाबत आलेल्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना नाहक भुर्दंड सहन करवा लागत आहे.
महावितरणकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सौर पंपाचे सर्व काम एजन्सीकडून केले जाणे अपेक्षित आहे. यात खड्डे खोदणे, साहित्याची वाहतूक, वाळू-सिमेंट खरेदी, तसेच मजूर पुरवठा हे सर्व समाविष्ट आहे. (Latest Pune News)
परंतु प्रत्यक्षात अनेक एजन्सीज शेतकर्यांकडून हे सर्व काम करून घेत आहेत. एवढे करूनही सौर पंपात काही बिघाड झाला तर वारंवार फोन करूनही संबंधित कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही शेतकर्यांकडून केला जात आहे.
याबाबत एजन्सीकडून, शेतकर्यांना साहित्य आमच्या गोडाऊनवरून घेऊन जा, तुम्हीच खड्डा खोदा, सिमेंट-वाळू आणा, मजूर द्या, तरच पंप उभारून देऊ, असे सांगितले जाते. त्यानंतर काम लवकर होण्यासाठी शेतकर्यांना ही सर्व कामे करावी लागतात.
...तरीही खर्च मिळाला नाही
दरम्यान, या प्रकरणी दै.फपुढारीफने याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर तत्कालीन शिरूरचे उपअभियंता सुमीत जाधव यांनी शेतकर्यांच्या समवेत चर्चा केली. त्यांनी शेतकर्यांच्या लेखी तक्रारी घेतल्या. त्यांचा अहवाल मुख्य अभियंता बारामती यांना मे महिन्यात पाठविला आहे. मात्र तरी सुद्धा आजपर्यंत त्यावर काही कारवाई झाली नाही किंवा शेतकर्यांना केलेला खर्च परत मिळालेला नाही.
पंप बसवण्यासाठी 3 ते 4 हजारांचा खर्च
सौर कंपनीच्या एजन्सीने सांगितल्याप्रमाणे आम्हीच फाकटे ते टाकळी हाजी सौर पंप साहित्याची वाहतूक केली. वाळू-सिमेंट आणले, खड्डे खोदले, प्लेट बसवण्याची सर्व कामे आम्हालाच करायला लावली. त्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च झाला. आता मात्र पंप बिघाड झाल्याने तो बंद आहे. मात्र, वेळोवेळी फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत कवठे यमाई येथील शेतकरी भाऊ घोडे यांनी व्यक्त केली.
एजन्सींना महावितरणचा पाठिंबा?
या गंभीर प्रकाराची दखल घेत माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऊर्जामंत्री, ऊर्जा संचालक व महावितरणचे बारामती येथील मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महावितरणमधील काही अधिकारीच एजन्सींना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकर्यांतून होत आहे.
ज्या एजन्सींविरुद्ध तक्रारी आहेत, त्या कंपन्यांना कामे देणे थांबवावे. शेतकर्यांकडून दबावाने लेखी तक्रार मागे घेण्याचा प्रयत्नही होत आहे. सौर पंप बसविताना एजन्सीकडून शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत असून, यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे .
- दामूशेठ घोडे, माजी सरपंच, टाकळी

