

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेत मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. महिलांमधून हिपळे ( ता. द. सोलापूर) येथील आरती परमेश्वर जाधव या राज्यात प्रथम आल्या आहेत.
अयोगातर्फे दि. 27 ते 29 मे 2025 या कालावधीत घेतलेल्या परीक्षेचा निकाल बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार विविध 20 संवर्गातील एकूण 461 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने अंतिम निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.
दरम्यान, आयोगाने स्पष्ट केले आहे की, अंतिम निकालाद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या आवेदनपत्रातील माहिती आणि दाव्यांच्या पडताळणीवर आधारित असेल. नियुक्तीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल.
न्यायालयाच्या अधीन राहून निकाल जाहीर
हा निकाल विविध न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर केला आहे. विशेषतः मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल रिट याचिका क्र. 1746/2026 संदर्भातील आदेशानुसार काही उमेदवारांचा निकालात समावेश केला आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांची शिफारस सध्या राखून ठेवली आहे. आरक्षित पदांवरील उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीच्या अधीन राहणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.