

Crime News: हडपसर येथील रामटेकडी येथे सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास सराइतांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून 17 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच त्यानंतर अवघ्या 16 तासांत आणखी एका 17 वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील निवृत्तीनगर येथे घडला.
श्रीपाद बनकर (17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. याबाबत जय काळभोर (18) याने याबाबत फिर्याददिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी विसर्जन मिरवणुकीची रांग लावण्याच्या कारणावरून श्रीपाद बनकर आणि अल्पवयीन आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्याचाच राग अल्पवयीन आरोपींच्या मनात होता. तेव्हापासून ते श्रीपादवर पाळत ठेवून होते.
3 डिसेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास श्रीपाद हा वडगाव बुद्रुक येथील आझाद मित्रमंडळ चौकातून दुचाकीवरून जात असताना आरोपीने श्रीपादला निवृत्तीनगर येथील गल्ली क्रमांक 4 येथे अडविले. आरोपींनी सत्तूरने त्याच्यावर सपासप वार केले. तसेच आरोपींनी शेजारी पडलेला मोठा दगड मारून श्रीपादला ठार मारले. घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हत्यासत्र पुन्हा सुरू
शहरात निवडणुकीच्या काळात बंद झालेल्या खुनाच्या घटना बंद झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारांनी आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात तीस तासांत खुनाच्या तीन घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता आणि रात्री सव्वाअकराच्या सुमारास दोन सतरावर्षीय मुलांचा खून करण्यात आला होता. त्यातच बुधवारी एक वाजता एका मजुराचा खून झाल्याची घटना वाघोली येथील लेबर कॅम्पमध्ये घडली. राजू लोहार (45) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत साहिल शेख (19) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. 4) दुपारी राजू लोहार आणि सहिल शेख हे दारू पिण्यासाठी वाघोली येथील रोहन अभिलाषा यांच्या लेबर कॅम्पमध्ये बसले असताना त्यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाले. या वेळी साहिलने राजूला दगडाने व हातांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर मारहाणीत राजूचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार दुपारी एकच्या सुमारास घडला.