

खडकवासला : शहर, उपनगरासह परिसरात रविवारी (दि.30) सकाळपासून जोरदार थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे सिंहगड, राजगड गडकोटांसह पानशेत, वरसगाव, गुंजवणी, खडकवासला धरण परिसरात थंडीची लाट सुरू झाली आहे. असे असले तरी थंडीची पर्वा न करता सिंहगड, राजगड किल्ल्यावर पर्यटकांची झुंबड उडाली होती. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली.
खडकवासला धरण तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतुकीचा फज्जा उडाला होता. खडकवासला धरण चौपाटीवरील फेरीवाले, टपऱ्यांची अतिक्रमणे जमीनदोस्त करूनही पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
दोन आठवड्यापासून सिंहगड, पानशेत, राजगड परिसरात थंडी सुरू आहे. मात्र, रविवारी सकाळपासून जोरदार थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे कडाक्याची थंडी पडली आहे. सकाळी 10 नंतर पर्यटकांची वर्दळ वाढली. सिंहगडच्या चोहोबाजूंच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा अप्रतिम नजराणा सूर्याच्या किरणांनी फुलून दिसत होता.
जलसंपदा विभागाने धडक कारवाई करून खडकवासला धरण चौपाटीवरील फेरीवाले, टपऱ्यांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. असे असले तरी जमिनीवर बसून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणारे पर्यटक तेथेच वाहने उभी करत आहेत. त्यामुळे मुख्य पुणे - पानशेत रस्त्यावरील वाहतूक दुपारपासून रात्रीपर्यंत कोलमडली होती. सुरक्षारक्षक, पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने सायंकाळी 7 वाजता प्रचंड वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. खडकवासला धरण माथ्याच्या दोन्ही बाजूला दूर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.