

पुणे : संसर्गजन्य आजारांचे वाढते आव्हान लक्षात घेऊन पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात 'एनआयव्ही'ने आधुनिक वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नक्षत्र महासंगणाकामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका या तीन विषाणूजन्य आजारांचे एकाच वेळी निदान करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर संस्थेत संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांचे निदान अधिक जलद, अचूक आणि तुलनेने कमी खर्चात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हे संशोधन प्रत्यक्षात साकारण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील, असा अंदाज आहे.
एनआयव्हीमधील शास्त्रज्ञांकडून मायक्रोफ्लुइडिक तंत्रज्ञानावर आधारित विशेष तपासणी संच विकसित केला जात आहे. या प्रकल्पासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून २.२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २०२५ ते २०२७ या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच तपासणी प्रक्रियेत तीन वेगवेगळ्या विषाणूंची उपस्थिती शोधणे शक्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
निपाह विषाणूच्या निदानासाठी एनआयव्हीने रंगबदलावर आधारित आरटी-लॅम्प हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या पद्धतीमध्ये विशिष्ट तापमानावर विषाणूचे जनुकीय घटक शोधले जातात. तपासणीचा निष्कर्ष रंगातील बदलावरून समजू शकतो. या तंत्रज्ञानाचे चार कंपन्यांकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. मंकीपॉक्स अर्थात एमपॉक्स विषाणूच्या निदानासाठीही अशाच प्रकारची रंगबदलावर आधारित चाचणी विकसित केली असून, तिचे तंत्रज्ञानदेखील चार कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष वैद्यकीय वापरापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने संस्थेने प्रयत्न केले आहेत.
पुणे एनआयव्ही येथे मे २०२५ मध्ये 'नक्षत्र' हे महासंगणक बसवण्यात आले. या सुविधेमध्ये ७०० संगणकीय कोअर आणि एक पेटाबाइट साठवण क्षमता आहे. विषाणूंच्या जनुकीय रचनेचा अभ्यास, नवीन विषाणूंचे प्रकार शोधणे, जैवमाहितीचे विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने औषधे व लसींच्या संशोधनाला गती देणे यासाठी तिचा उपयोग होणार आहे.