

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीच्या मार्यामुळे चांदी आणि सोन्याच्या भावात घसरण झाली. त्याचे पडसाद मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) या वायदे बाजारात उमटले. चांदीचा किलोचा भाव तब्बल 23 हजार रुपयांनी कमी झाला, तर सोन्याच्या भावात 2,700 रुपयांनी घट झाली.
कॉमेक्स या आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोमवारच्या सत्रात सोन्याचा प्रतिऔंस (28.34 ग्रॅम) दर 4,550 डॉलरवर, तर चांदीचा दर 83.75 डॉलर प्रतिऔंसवर गेला होता. वायदे बाजारातील सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी सोन्याचा प्रतिऔंस दर 4,434 डॉलरवर आणि चांदीचा भाव 73.90 डॉलर प्रतिऔंसवर आला.
भारतीय वायदे बाजारातही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद उमटले. एमसीएक्सवर चांदीचा प्रतिकिलो भाव 2 लाख 54 हजार रुपयांवर होता. त्यात 2 लाख 31 हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1 लाख 40 हजार 400 रुपयांवरून 1 लाख 37 हजार 700 रुपयांवर आला. सोमवारी सायंकाळी सात वाजता अमेरिकन बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचा प्रतिऔंस भाव 4,460 डॉलरवर गेला होता, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 75.50 डॉलरवर गेला होता.