पराभवानंतर बारामतीत राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट

पराभवानंतर बारामतीत राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या आणि शहरातील दोन्ही कार्यालये आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भवनामध्ये मंगळवारी (दि. 4) निकाल जाहीर होऊ लागताच शुकशुकाट पसरला. लाखोंच्या फरकाने उमेदवार निवडून येणार अशी घोषणाबाजी करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी नॉट रिचेबल झाले.
बारामतीच्या यंदाच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष होते. येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. कागदावर अजित पवार यांच्याकडे बलाढ्य ताकद असल्याचे दिसत होते.

प्रत्यक्षात मतात ती ताकद परावर्तीत झाली नाही. हे अजित पवार यांचे अपयश नसून त्यांच्यानंतर दुसर्‍या फळीत काम करणार्‍या बेजबाबदार पदाधिकार्‍यांचे असल्याचे आता बारामतीकर जाहीर बोलू लागले आहेत. निवडणूक प्रचार काळात देशासह जगभरातील माध्यमांचे बारामतीकडे लक्ष लागले होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधी बारामतीत दाखल झाले होते. त्यामुळे अजित पवार गटांकडे असणारी दोन्ही राष्ट्रवादी भवन कायम गर्दीने फुल्ल होती. पदाधिकार्‍यांच्या बाईटसाठी चढाओढी दिसून यायच्या. हे पदाधिकारी मंगळवारी बारामतीत दिसले नाहीत.

पक्ष फुटीनंतर शरद पवार गटाकडे स्वतःचे कार्यालयच उरले नव्हते. दोन्ही भव्य-दिव्य कार्यालये अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे काम कोठून सुरू करायचे हा प्रश्न त्यांना पडला होता. पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. संदीप गुजर यांच्या मालकीच्या एका जुन्या इमारतीलाच पक्ष कार्यालयाचे स्वरूप देण्यात आले. तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. जगताप, शहराध्यक्ष अ‍ॅड. संदीप गुजर, युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी येथून हळूहळू कामाला सुरुवात केली. सुरुवातीला या कार्यालयात यायला देखील लोक घाबरायचे.

पुढे हळूहळू कार्यकर्ते गोळा होऊ लागले. या छोट्याशा कार्यालयाने अहोरात्र सुप्रिया सुळे यांच्यासाठी परिश्रम घेतले. हे परिश्रम त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. दुसरीकडे पॉश कार्यालये असतानाही अजित पवार गटाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मंगळवारी निकाल जाहीर होताना एका छोट्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष तर राष्ट्रवादीच्या भव्य-दिव्य कार्यालयाबाहेर शुकशुकाट दिसून आला.

निवासस्थानांसमोर बंदोबस्त

निवडणूक निकालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबागेसमोर पोलिस बंदोबस्त तैनात होता. या दोन्ही ठिकाणी मंगळवारी पवार कुटुंबियातील कोणीही नव्हते. परिणामी गोविंदबागेसमोर जल्लोषाला मर्यादा आल्या. खरा जल्लोष शहरातील पक्ष कार्यालयासमोरच झाला.

पुतण्याने लढवली खिंड

प्रचार काळात आपले काका अजित पवार यांचा हात सोडत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची युगेंद्र पवार यांनी जबाबदारी उचलली. शरद पवार गटाच्या कार्यालयातून त्यांनी काम सुरू केले. युगेंद्र यांनी मंगळवारी देखील कार्यालयात बसत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. सुळे यांच्या विजयात आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी शरद पवार गटाने सुरू केली असून अजित पवार गटाला विधानसभेलाही जेरीस आणले जाईल, अशी स्थिती सध्या इथे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news