

पुणे: कोयता गँगच्या गुन्हेगारांकडून चोरीच्या सोन्याची खरेदी केल्याची बतावणी करत कर्नाटक येथील सराफा व्यावसायिकाकडून 25 तोळ्यांहून अधिक सोने तपासासाठी घेऊन त्यावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी, वानवडी पोलिस ठाण्यातील दोन हवालदारांसह शिपायांवर ठपका ठेवत परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हवालदार महेश विठ्ठल गाढवे, हवालदार सर्फराज नूरखान देशमुख, शिपाई संदिप आनंदा साळवे व शिपाई सोमनाथ पोपट कांबळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी कर्नाटक येथे जाऊन जैन यांचे दुकान गाठले. यावेळी, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याच्या दहा ग्रॅमच्या नेकलेसच्या गहाण खताची पावती जैन यांना दाखविली आणि तीस हजार रुपये दिल्याचे कबूल केले.
या दरम्यान, पोलिसांनी तू चोराकडून शंभर तोळे सोने घेतले असून, ते चोरीचे असल्याचा दबाव आणला. गुन्ह्याच्या तपासासाठी ते शंभर तोळे आमच्या ताब्यात दे. तू जे सोने ज्यांच्याकडून घेतले आहे, ते कोयता गँगचे लोक आहे. त्यांनी पोलिसांवरसुद्धा हल्ला केलेला आहे, अशी धमकी देऊन जैन यांना तडजोडीअंती 279.980 ग्रॅम सोने देण्यास भाग पाडले.
सोने घेऊन गेल्यानंतर जैन यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात जात सोन्याबाबत चौकशी केली. त्यांनी वानवडी येथील पोलिस ठाण्यात चौकशी केली. यावेळी, सोन्याच्या चोरीबाबतचा असा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसून, सोने जप्त केले नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर, जैन यांनी पोलिसांत जात पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतलेले सोने आपापसात वाटून घेतले असल्याची तक्रार पोलिसांत दिली.
गुन्ह्याच्या अनुषंगाने वानवडी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांना तक्रार अर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी, आरोपींनी केलेल्या कृत्यामुळे पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थि निर्माण होण्यासारखी घटना घडली आहे.
तुम्ही कर्तव्यात करून केली आहे. त्यामुळे वार्षिक वेतनवाढ पुढील दोन वर्ष कालावधीसाठी रोखण्याची शिक्षा का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. त्यावर, अंशत: समाधान झाल्याने भविष्यात सुधारण्याची संधी देत नोटीसमध्ये दिलेल्या शिक्षेमध्ये बदल करत परिमंडळ पाचचे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी आरोपींना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.