तळेगाव ढमढेरे/शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : रात्री जेवणानंतर शतपावली करणार्या महिलेला भरधाव मोटारीने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात महिलेच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले. केशरबाई अशोक निकम (वय 64 वर्षे, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत केशव दत्तात्रय फडतरे (वय 52, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशरबाई निकम या जेवणानंतर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वढू बुद्रुक रस्त्याने मंगळवारी (दि. 9 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करत होत्या. त्यावेळी वढू बुद्रूक बाजूने भरधाव आलेल्या थार मोटारीची केशरबाई यांना जोरदार धडक बसून त्या रस्त्यावर कोसळल्या. कारने त्यांना चिरडत पन्नास फूट लांब फरफटत नेले. दरम्यान केशरबाई यांच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी एमएच 12 व्हीझेड 7287 या क्रमांकाची काळया रंगाची थार मोटार ताब्यात घेतली आहे. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे पुढील तपास करत आहेत.
कोरेगाव भीमा येथील वढू बुद्रुक रस्त्याचे काम झाल्याने येथील वर्दळ वाढून वाहनांचा वेगदेखील वाढला आहे. या रस्त्यावर अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात होऊन महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा