पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहरातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर दावा केला असतानाच आता त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही सहा जागांची मागणी केली आहे. अद्याप काँग्रेसने आपली जागांबाबतची भूमिका स्पष्ट केली नसली तरी पुण्यातील मतदारसंघावरून आघाडीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत प्रत्येकी चार मतदारसंघ या दोन पक्षांकडे होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्षाचाही समावेश असणार आहे. त्यामुळे कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सहा मतदारसंघांत पक्षाची ताकद असल्याने त्यांची मागणी प्रदेशकडे करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर आणि पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर लगचेच शिवसेना ठाकरे पक्षानेही जागांवर दावा ठोकला आहे. या पक्षाची मुंबईत शनिवारी आढावा बैठक झाली. बैठकीत पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये कोथरूड, पर्वती, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शहर पदाधिकार्यांनी वरिष्ठांकडे अहवालाद्वारे केली असल्याचे शहरप्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे यांनी सांगितले.
आघाडीच्या काळात कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर या जागा काँग्रेसकडे होत्या. त्यामधील पुणे कन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांवर राष्ट्रवादी पवार पक्षाने, तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट या जागांची सेना ठाकरे पक्षाने मागणी केली आहे. यात कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागांवर ठाकरे आणि पवारांनी केलेल्या दाव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा