शिरूर लोकसभेचे वातावरण तापले; आढळराव ठाम, कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर

शिरूर लोकसभेचे वातावरण तापले; आढळराव ठाम, कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर
Published on
Updated on

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या उमेदवारीवर ठाम असून, उमेदवारीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. याचवेळी खेड आणि जुन्नरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आढळराव यांच्या पक्षप्रवेशाला उघड विरोध केला आहे.

दरम्यान, सध्या भाजपमध्ये असलेले व अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद यांची पुन्हा घरवापसी करून राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे भाजपच्या शिरूर लोकसभा कार्यकर्ता संमेलनामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रथमच जाहीरपणे आपणदेखील खासदारकीची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येत्या 8 दिवसांत पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूरच्या जागेबाबत व आपल्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेतील. आपण गेले पाच वर्षांपासून शिरूर लोकसभा निवडणुकीची तयारी करत असून, निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. याच वेळी शिरूरची ही जागा महायुतीमध्ये आता जवळपास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच आढळराव पाटील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आढळराव यांच्या प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जाहीर विरोध केला आहे. यामुळे आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश फारसा सोपा नसेल हे आताच स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार व डॉ. अमोल कोल्हे यांना हरविणार असे यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. परंतु उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट नाही. या पाश्र्वभूमीवर शिरूरमधून अजित पवार यांचे कट्टर समर्थक व सध्या भाजपमध्ये असलेले प्रदीप कंद यांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. कंद यांचा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष असताना गावोगाव चांगला जनसंपर्क होता, तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांंच्या विरोधात जाऊन प्रथमच भाजपमधून संचालक म्हणून भरघोस मतांनी निवडून आले होते. नवीन व तरुण चेहरा, भाजपचा पूर्ण पाठिंबा, चारही आमदारांचा भक्कम पाठिंबा कंद यांना मिळू शकतो. तसेच इतर पक्षातीलच लोकांशी असलेला थेट संपर्क यासारख्या अनेक बाबी कंद यांच्या जमेच्या आहेत. त्यातच भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील प्रथमच आपण खासदारकीची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. यामुळेच आता शिरूरमधील महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत सर्व काही स्पष्ट होईल.

प्रदीप कंद, संचालक, जिल्हा बँक व माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news