मंचर: पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रतिकूल वातावरणात मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाची काढणी, वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातून काढणीस आलेल्या कोबी पिकामध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांनी फ्लॉवर, कोबी, धना, मेथी आदी पिके घेतली आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे पिकांवर झालेल्या किडी व रोगांच्या प्रादुर्भावावर महागडी औषध फवारणी करण्यात आली. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने फ्लॉवर, कोबीचे उत्तम पीक घेतले. परंतु, पीक काढणीस आले आणि बाजारभाव कोसळले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोबीच्या शेतात मेंढ्यांचे कळप तसेच जनावरे सोडण्याची वेळ या शेतकर्यांवर आली आहे.
उत्पादन खर्चही निघेना
येथील शेतकर्यांनी रब्बी हंगामात कोबीची लागवड केली. किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागला.
मात्र, हा खर्च वसूल होईल, असा भाव बाजारात मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सद्य:स्थितीत 10 किलोसाठी 20 ते 50 रुपये बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही भागात नाही.
दराच्या घसरणीमुळे फ्लॉवर शेती परवडत नाही. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक यामुळे पोत्यामागे हातात काहीच शिल्लक राहात नाही. औषध व लागवडीचा खर्चही निघत नाही. भाजीपाला पिकविणे तोट्याचेच ठरत आहे. शासनाने भाजीपाल्याला योग्य हमीभाव ठरविला तरच ही शेती परवडणार आहे.
- ज्ञानेश्वर पोखरकर,कृषीनिष्ठ शेतकरी, पिंपळगाव
उत्पादन खर्च सोडा काढणीचा खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकरी बाजारात जाऊन दहा रुपयाला दोन गड्डे विकत आहेत. भाजीपाला पिकाला हमीभाव, नियोजनाचा अभाव यामुळे कोबी उत्पादक शेतकर्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.
- रामशेठ गावडे, संचालक, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती
मंचर बाजारात सध्या 10 किलो फ्लॉवरला 20 ते 50 रुपये, बीटला 100 ते 125 रुपये, कोबीसाठी 20 ते 50 रुपये, टोमॅटो 150 ते 200 रुपये, दुधी भोपळा 125 ते 150 रुपये, गवार 100 ते 200 रुपये, असे दर मिळत आहेत.
- सचिन पानसरे, उपसभापती, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती