

भोर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाईदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास
सोमवारी (दि. 22) भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या वेळी श्री काळुबाईदेवीची यथोचित पूजा-अर्चा करून पारंपरिक पद्धतीने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. (Latest Pune News)
मांढरदेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खैरमाटे, त्यांच्या पत्नी, तसेच प्रशासकीय विश्वस्त तथा वाईच्या प्रांताधिकारी सोनाली मेटकरी, विश्वस्त सुनील मांढरे, चंद्रकांत मांढरे, विजय मांढरे, सुधाकर गुरव, ओंकार गुरव, भाविक भक्त उपस्थित होते.
येथील मंदिर दुसऱ्या माळेपासून म्हणजे मंगळवार (दि. 23)पासून भाविकांना दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. देवीला येणाऱ्या भाविकांसाठी मांढरदेव देवस्थान ट्रस्टमार्फत तत्काळ दर्शन व्यवस्था केली आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये भजन, गायन अशा सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रम दररोज पार पडणार आहे. संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त, कमांडो, दवाखाना, ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भोर तालुक्याच्या हद्दीवर मांढरदेवी देवस्थान आहे. त्यामुळे भोर - आंबाडखिंड घाटातून गडावर भाविकांना दर्शनासाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे या उत्सव काळात भोरला विशेष महत्त्व असते. श्री काळूबाई देवीच्या गडावर जाण्यासाठी भोरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या मार्गावरील विविध व्यावसायिकांना मोठा फायदा होतो.
गडावर दाट धुके
सध्या मांढरगडावर धुक्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वाहने व्यवस्थित चालवावीत. देवीचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी भाविकांसह गावकऱ्यांनी, व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.
मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीची घटस्थापना करण्यात आली. (छाया : अर्जुन खोपडे)