

राजगुरुनगर: गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली शिवजयंती महोत्सव आयोजित करून प्रशासन व शासन नियुक्त एजन्सी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहेत. यामुळेच यंदा मी थेट अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून 9 कोटींचा निधी 4 कोटींपर्यंत कमी करून घेतल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
राज्यातील अन्य सर्व महाबळेश्वर, नाशिकसह महोत्सवांना दर वर्षी शासनाकडून निधी वाढवून दिला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी शिवजयंती महोत्सवाचा निधी कमी केल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरच्या शिवनेरी शिवजयंती महोत्सवाच्या साठ टक्के निधीला कट लावल्यासंदर्भात दै. ’पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले.
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी या बातमीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर मी माझ्या पहिल्या टर्ममध्ये सन 14-15 व सन 15-16 मध्ये शिवजयंती महोत्सव सुरू केला. त्या वेळी शासनाने 80 लाख रुपये दिले होते. त्यानंतर दर वर्षी हा निधी वाढत गेला. कोरोनानंतर शासनाने हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. यासाठी महोत्सवासाठी देण्यात येणारा निधी 7, 8, 9 कोटींपर्यंत वाढविण्यात आला.
परंतु, महोत्सवावर कोट्यवधी रुपये खर्च करताना स्थानिक लोकांना डावलून प्रशासकीय अधिकारी मुंबईत बसून एजन्सीमार्फत हा महोत्सव राबवत होते. शिवजयंती महोत्सव फक्त पैशाची उधळपट्टी करण्यासाठी साजरा केला जात होता. यामुळेच तालुक्याचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून शासनाला जुन्नर शिवनेरी शिवजयंती महोत्सवाचा निधी कमी करण्यास सांगितले, असे स्पष्टीकरण शरद सोनवणे यांनी दिले.