

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) 48 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे नेते दीड वर्षानंतर येथे एकत्र आले. सभेच्या पूर्वी आलेले अजित पवार थेट संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले. सुमारे अर्धा तास ते केबिनमध्येच होते. यावेळी त्यांच्या गटाचे नेते आमदार दिलीप वळसे पाटीलही तेथे उपस्थित असल्याचे समजले. दरम्यान, सभेच्या व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसण्याची लावलेली नावाची पाटी बदलून अजित पवार यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना मध्यभागी बसविले. त्यामुळे काका-पुतण्यांना शेजारी-शेजारी बसण्याचा योग अजित पवार यांनी टाळल्याचे दिसून आले.
व्हीएसआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचेवळी साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमात विश्ूवस्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानुसार दोन्ही पवारांची बैठक व्यवस्था व्यासपीठावर शेजारी-शेजारी करण्यात आली होती. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी अगोदर अजित पवार हे व्यासपीठावर आले आणि त्यांच्या शेजारी-शेजारी बैठक व्यवस्था आणि नावाची पाटी असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती व्यवस्था बदलली. सभेनंतर अजित पवार यांना विविध विषयांवर पत्रकारांनी छेडले. त्या वेळी शेजारी-शेजारी बसणे टाळल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे प्रथमच सहकारमंत्री झाले असून, त्यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. म्हणून त्यांना शेजारची खुर्ची दिली.