

Pudhari Eco Friendly Ganesh Idol Making Workshop in pune
पुणे: यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी दै. ‘पुढारी’ने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या विशेष सहकार्याने शहरातील प्रमुख 10 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमात शालेय विद्यार्थी स्वतः शाडू माती वापरून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार, दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी येथे होणार आहे. (Latest Pune News)
लहान मुलांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी आणि ते भविष्यात पर्यावरण रक्षणाचे दूत बनावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मुलांची आकलनशक्ती तीव्र असल्यामुळे लहान वयात दिलेले संस्कार कायमस्वरूपी त्यांच्या मनात रुजतात. यामुळे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच कळावे, यासाठी हा प्रयत्न दै.‘पुढारी’च्या वतीने केला जात आहे.
विद्यार्थी गिरविणार पर्यावरण रक्षणाचे धडे
दैनिक पुढारी शाडू मातीने घडणार्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबतच यावेळी हवा आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर परिणामांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. प्रदू षण कमी करून, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, याकरिता ‘पुढारी’ने ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना देखील शिकवल्या जाणार आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची पूजा आणि त्यांचे पारंपरिक पद्धतीने जलप्रवाहात विसर्जन याचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत असतो. यात प्रामुख्याने जलप्रदूषण, अनेक वेळा मूर्ती विसर्जनामुळे नदी, तलावांचे पाणी प्रदूषित होते. कारण अशा मूर्तींमध्ये प्लास्टिक, सिंथेटिक रंग, रासायनिक घटक असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सामाजिक संस्थाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करीत आहेत. त्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आणि पर्यावरणरक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
श्री गणेश हे ज्ञानाचे, बुद्धीचे, चातुर्याचे, आनंद व उत्साहाचे प्रतीक आहे. या गणेशोत्सवाचा आनंद आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून द्विगुणित करूया. या गणेशोत्सवात फक्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू, अशी प्रतिज्ञा घेऊ व दैनिक ’पुढारी’ने सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊया.
- डॉ. विवेक सावजी, कुलगुरू, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ, पुणे.
शाडू मातीपासून मूर्ती कशी बनवायची, याचे कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करता येणार आहे. याशिवाय गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केल्यावर जी मूर्तीची विटंबना होते, ती पाण्यात लवकर विरघळत नाही. याबाबतच्या धार्मिक, पर्यावरण फायद्याच्या माहितीचे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच धडे मिळण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, ते धडे विद्यार्थी मोठे झाल्यावर त्यांना आणि पर्यावरण रक्षणाला महत्त्वाचे ठरतील. दैनिक ‘पुढारी’च्या या कार्याला शुभेच्छा!
- फुलचंद चाटे, संस्थापक संचालक, चाटे पब्लिक स्कूल
शाडू मातीचा गणपती तयार करणे हा दै. ‘पुढारी’चा स्तुत्य उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये दूरदृष्टी निर्माण करणारा आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व नीतिमूल्ये हीच खरी ओळख निर्माण करायची असेल तर शिस्त, आदर व पर्यावरणाबद्दल प्रेम ही नीतिमूल्ये लहानपणापासूनच आत्मसात करायला हवीत. मजबूत नीतिमूल्ये हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ ठरतात. अशा उपक्रमामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढेल व पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण होईल, असे मला वाटते. असा माझा विश्वास आहे.
- माधवी के., मुख्याध्यापिका, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल, धनकवडी, कात्रज, पुणे.
निसर्गापासून फारकत घेत अलीकडील सण उत्सव साजरे होताना दिसतात. ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सवासारखा महत्त्वाचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे गरजेचे आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा दैनिक ‘पुढारी’चा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. त्याचा प्रारंभ शाळा-शाळांमधून होत आहे, त्यामुळे संस्कारक्षम वयात पर्यावरणाविषयीचे प्रेम आणि पर्यारणाविषयीची बांधीलकी मुलांमध्ये निर्माण होईल, अशी खात्री वाटते.
- प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख, सांस्कृतिक विभाग, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ, पुणे.
दैनिक ‘पुढारी’ कडून राबवल्या जात असलेल्या या स्तुत्य उपक्रमासाठी ‘एन्व्हायर्न्मेंट पार्टनर’ म्हणून ‘ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या आमच्या संस्थेला सहभागी होताना अत्यंत आनंद होतो आहे. या उपक्रमात बाळगोपाळांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आम्ही सुपारीच्या नैसर्गिकरीत्या गळून पडलेल्या झावळीच्या बुंध्याकडील भागाचा वापर करून बनवलेल्या थाळ्या पुरवणार आहोत. या थाळ्यांना ‘अरेका प्लेट्स’ हे इंग्रजी नाव आहे.
- पुरुजित परदेशी, डायरेक्टर, ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रा. लि., पुणे.
‘पुढारी’ ची ही मोहीम खरोखर प्रशंसनीय आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तीद्वारे पर्यावरणाचे रक्षण करत उत्सव साजरा करणे, ही एक सर्जनशील कल्पना आहे. यासाठी सर्वंकष सहभाग आवश्यक असतो. ‘पुढारी’ ला एमपीसीबी आणि पीएमसीसारख्या संस्थांचा पाठिंबा लाभल्यामुळे ही मोहीम आणखी सशक्त झाली आहे.
- राजेंद्र शेंडे, पर्यावरणतज्ज्ञ
लहान मुलांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजविण्यासाठी आमच्या शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये झाडे, पाने, फुलांपासून गणेशोत्सव बनविण्यास मुलांना सांगण्यात आले होते. गणरायाचे विसर्जन अनेक वेळा ओढ्या-नाल्यांमध्ये अथवा नदीमध्ये केले जाते. हा पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आहे. आत्तापासूनच या मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती केल्यास आगामी काळात पर्यावरणाची होणारी हानी आपल्याला कमी करता येणार आहे.
- सागर बालवडकर, विश्वस्त, सीएम इंटरनॅशनल स्कूल.