वाल्हे: दौंडज (ता. पुरंदर) हद्दीतील नलवडेवाडी, तरसदरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील नागरिकांकडून पाण्याचे शासकीय टँकर त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबतचा प्रस्ताव पुरंदर पंचायत समितीकडे शुक्रवारी (दि. 28) देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका महादेव माने यांनी दिली.
मागील 2-3 वर्षांपासून दौंडज परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तर आता दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक जलस्रोत आटून गेले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित या परिसरात पाण्याचे शासनाकडून टँकर सुरू व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागील 2 वर्षांपासून केंद्र शासनाने जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नाहीत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तर अनेक गावांत जलजीवन मिशनची कामे रडतखडत सुरू असून, ती वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दौंडज ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही. याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही तत्काळ करण्यात येईल.
- सचिन घुबे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पुरंदर.