दिंडीतील वारकर्‍यांच्या अपघातामुळे मावळातील सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर !

Published on
Updated on

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा

यापूर्वी ज्या ज्या वेळी अपघात घडले त्या त्या प्रकर्षाने जाणवत असलेल्या सेवारस्त्याचा प्रश्न मुंबई पुणे महामार्गावर घडलेल्या दिंडीतील वारकर्‍यांच्या भीषण अपघातामुळे ऐरणीवर आला आहे. दरम्यान शासनाने आतातरी गांभीर्य लक्षात घेऊन सेवा रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई पुणे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग मावळ तालुक्याच्या मध्यभागातून गेला असून महामार्गाच्या एका बाजूला पवनमावळ तर दुसर्‍या बाजूला आंदरमावळ व नाणेमावळ हा ग्रामीण भाग विखुरलेला आहे. महामार्गलगत सोमाटणे, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, साते, जांभूळ, कान्हे, नायगाव, कामशेत, शिळाटने, वाकसई, लोणावळा, खंडाळा ही शहरे व गावे आहेत.

त्यामुळे पूर्वीपासून दळणवळणाचा मुख्य मार्ग म्हणून तालुक्यातील नागरिक महामार्गाचाच वापर करतात. महामार्गलगत वाढत असलेली रहदारी, दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक लक्षात घेता महामार्गलगत दोन्ही बाजूंना सेवा रस्ता असणे गरजेचे आहे. यापूर्वी प्रामुख्याने कामशेत, कान्हे, साते, ब्राम्हणवाडी या परिसरात सेवारस्ता नसल्याच्या कारणाने अनेक अपघात घडले असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

त्यामुळे सेवारस्ता व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे.दरम्यान रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून एखादी गंभीर घटना घडली की मगच दखल घ्यायची व तात्पुरती उपाययोजना करायची, यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकजण कायमचे दिव्यांग झाले आहेत. सद्यस्थितीत फक्त तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत याठिकाणी काही प्रमाणात सेवा रस्ता केला आहे.

परंतु इतर ठिकाणी गरज असूनही तो केला नाही, त्यामुळे प्रामुख्याने वडगाव, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडी, मोहितेवाडी साते, कान्हे, नायगाव, कामशेत या परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. या भागात सेवा रस्त्याची आवश्यकता आहे, याची जाणीव असूनही रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

शनिवारी घडलेल्या दिंडीतील वारकर्‍यांच्या भीषण अपघातामुळे सेवा रस्त्याचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला. वास्तविक या प्रश्नाकडे यापूर्वीच जाणीवपूर्वक लक्ष दिले असते तर ही दुर्दैवी घटना टळली असती अशीही चर्चा तालुक्यातील सुरू होती. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचे महत्व प्रकर्षाने जाणवले. दरम्यान, लोकप्रतिनिधी व शासनाने आतातरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पुणे महामार्गालगत सेवा रस्ता करावा अशी मागणी मावळवासीय करत आहेत.

https://youtu.be/yV0Fs94q0mw

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news