

पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आमची महायुती असून, अपवादात्मक ठिकाणी आम्ही समजूतदारीने वेगळे लढण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पुण्यात भाजप स्वतंत्र लढणार का? अशी चर्चा सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील महायुतीसंदर्भातला निर्णय वरिष्ठ नेत्यांवर ढकलला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जे ठरवतील त्यानुसार महायुतीबाबत निर्णय होईल. तसेच उमेदवारीबाबत निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा राहणार आहे, असे देखील मोहोळ यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि. 16) आढावा बैठक घेतली. या वेळी पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार का? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले. (Latest Pune News)
मुरलीधर मोहोळ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने 6 महिन्यांच्या आत निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आमची महायुती आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार. पण, महायुती करायची की नाही, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.