

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदी प्रथमच एका महिलेची निवड झाली असून ॲड.रोहिणी पवार असे त्यांचे नाव असून त्यांनी आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त हा मान मिळविला आहे.
पवार यांच्याबरोबरच झी टॉकीज गजर कीर्तनाचा व बिग बॉस फेम ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर लोंढे यांची देखील देवस्थान विश्वस्तपदी निवड झाली आहे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी ही नियुक्ती केली आहे. देवस्थान कमिटीच्या एकूण विश्वस्तांची संख्या सहा असून त्यापैकी तीन जागा रिक्त होत्या.या रिक्त जागांवर या निवडी करण्यात आल्या. या अगोदर ॲड.राजेंद्र उमाप,डॉ.भावार्थ देखणे,योगी निरंजनाथ हे विश्वस्त असून आता तीन जणांची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने देवस्थान कमिटीत महिला विश्वस्तांची निवड करण्या बाबतच्या रीट याचिकेला फेटाळून लावले होते. त्यामुळे महिला विश्वस्तांची निवड होण्याबाबतची शक्यता धूसर झाली होती.मात्र गुरुवारी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी महिला विश्वस्तांची निवड जाहीर करत.अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली.पवार या कायदेतज्ज्ञ असून, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्या परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे मंदिर व्यवस्थापनात कायदेशीर दृष्टिकोन आणि महिलांचा सहभाग वाढेल.
आळंदीतील नागरिकाचा विश्वस्त कमिटीत सहभाग असावा यासाठी वर्षभरापूर्वी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला देखील यश आले असून ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर व ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील या आळंदीतील नागरिकांची यात निवड झाली आहे.