

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8 हजार 169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीअंतर्गत लिपिक / टंकलेखक 7 हजार 7 आणि कर साहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. परंतु सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल 6 महिने निवड यादी जाहीर झाली नव्हती.
परंतु आमदार हेमंत रासने यांच्या प्रयत्नातून अखेर निवड यादी जाहीर झाली. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी आमदार हेमंत रासने यांचा सत्कार करत आभार मानले. एमपीएससीच्या संयुक्त गट ब आणि गट क भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे 7 हजार उमेदवांराचे भविष्य संकटात सापडले होते. मॅट कोर्टात दाखल याचिकेमुळे भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
हा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित उमेदवारांनी आमदार हेमंत रासने यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती. उमेदवारांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रक्रियेस गती देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालत एमपीएससीला आवश्यक निर्देश दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेत गती आल्याने अखेर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्पर्धा परीक्षार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात. परंतु संपूर्ण परीक्षा पार पडूनदेखील भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये चिंता होती. हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निवड यादी जाहीर झाली. स्पर्धा परीक्षार्थींना न्याय मिळाला. यापुढेही स्पर्धा परीक्षार्थींच्या हक्कांसाठी मी कायम आग्रही राहीन.
- हेमंत रासने, आमदार.
या निर्णयामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असून, भरती प्रक्रियेतील अत्यंत विलंबामुळे आमची मेहनत वाया जाण्याची भीती होती. परंतु आमदार हेमंत रासने यांची तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीचे आदेश देऊन न्याय मिळवण्यात मदत केल्याने आमचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विलंबामुळे स्पर्धा परीक्षार्थींना त्रास होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी.
- ज्ञानेश्वर गोरे, निवड झालेला उमेदवार.