'विघ्नहर' कारखान्यावर पुन्हा सत्यशील शेरकर यांचीच सत्ता

१७ जागा झाल्या होत्या बिनविरोध; उर्वरित ४ जागांवर घवघवीत यश
Narayangaon News
'विघ्नहर' कारखान्यावर पुन्हा सत्यशील शेरकर यांचीच सत्ताPudhari
Published on
Updated on

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलने सर्वच जागांवर विजय मिळवून कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संचालकांच्या २१ जागांपैकी तब्बल १७ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित चार जागांवर देखील प्रचंड मताच्या फरकाने सत्यशील शेरकर यांचे उमेदवार विजयी झाले.

विघ्नहरच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी (दि. १६) सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. साडेअकरा वाजता सर्व निकाल हाती आले. पहिला निकाल ओबीसी गटाचा लागला. यामध्ये शिवनेर पॅनेलचे सुरेश भिमाजी गडगे ९ हजार ९२० मतांनी विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रहेमान इनामदार यांना अवघी ११६ मते मिळाली. या गटातील दुसरे उमेदवार निलेश भुजबळ यांना २२१ मते मिळाली.

शिरोली गटामध्ये सत्यशील शेरकर यांना १० हजार ६१७ पैकी १० हजार ४२३ सर्वाधिक मते मिळाली. या गटातील सुधीर खोकराळे यांना १० हजार ५७ मते मिळाली, तर संतोष खैरे यांना १० हजार २५मते मिळाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. एकूण मतदानापैकी ९९७ मते अवैध ठरली. कारखान्याचे एकूण सभासद १९ हजार ६२७असून यापैकी १० हजार ६१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान विघ्नहर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. यामध्ये एकूण ६६ अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ४ अर्ज बाद झाले होते. शिल्लक ६२ पैकी ३७जणांनी माघार घेतली होती. जुन्नर गटामधून अशोक घोलप, देवेंद्र खिलारी व अविनाश पुंडे हे तिघे बिनविरोध निवडून आले. ओतूर गटामधून धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, रामदास वेठेकर व पंकज वामन हे चौघेजण बिनविरोध निवडून आले आहेत.

पिंपळवंडी गटामधून विवेक काकडे, प्रकाश जाधव व विलास दांगट हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. घोडेगाव गटामधून यशराज काळे, नामदेव थोरात व दत्तात्रय थोरात हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. महिला गटामधून नीलम तांबे व पल्लवी डोके या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अनुसूचित जाती/जमाती गटामधून प्रकाश सरोदे तसेच विमुक्त जाती/जमाती या गटामधून संजय खेडकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान विघ्नहर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके, माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांनी मदत केली.

ऊसाला अंतिम दर ३ हजार ५०० रुपये मिळावा : शेतकरी संघटना

विघ्नहरच्या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेने सत्यशील शेरकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. सत्यशील शेरकर भविष्य काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी सांगितले. हांडे म्हणाले की, नव्याने सत्तेवर आलेले संचालक मंडळ यंदाच्या वर्षी गाळपाला येत असलेल्या उसाची पहिली उचल ३ हजार रुपये देईल व अंतिम बाजार भाव ३ हजार ५०० रुपये देईल अशी आमची मागणी आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत निवृत्तीशेठ शेरकर, माजी अध्यक्ष दिवंगत सोपानशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारखान्याचा कारभार केला जात आहे आणि यापुढेही केला जाणार आहे. त्यांचा आशीर्वाद व सभासदांचे सहकार्य यामुळे हे यश मिळू शकले. विघ्नहर कारखाना सभासदांच्या मालकीचा असून मी व माझे संचालक मंडळ विश्वस्त म्हणून सभासदांच्या हिताची काळजी घेत आलो आहे व यापुढे देखील त्यांची नेहमीच काळजी घेत राहणार आहे.

- सत्यशिल शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news