

पिंपरी /पुणे: शनिवारची मध्यरात्र, सर्वत्र शांतता अन् निगडी प्राधिकरणातील सावली हॉटेल परिसरात दबक्या पावलाने बिबट्या आला. मात्र, कोणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. रविवारची पहाट उजाडली आणि थरार सुरू झाला...! संत कबीर उद्यान परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती नागरिकांकडून पोलिसांना मिळाली. वन विभागास वर्दी मिळाली. गर्दी जमली. रेस्क्यु टीमने बिबट्यास जेरबंद केले.
निगडी प्राधिकरणातील संत कबीर उद्यानात माळी पदावर असलेले सुधीर कोळप हे उद्यानातील क्वॉर्टरमध्ये वास्तव्य करतात. मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांना कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज येत होता. नेहमीप्रणाणे कुत्रे भुंकत असतील असा अंदाज त्यांनी लावला आणि झोपून गेले.
रविवारी पहाटे साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास मेडिटेशन क्लास संपवून अविनाश वासवानी आणि त्यांची मुलगी रेणी वासवानी असे दोघे घराच्या आवारात चहा पीत होते. त्यावेळी समोर अचानक बिबट्या उभा राहिला. तो साधारण चार फुटांवरच असल्याचे पाहून त्यांचा भीतीने थरकाप उडाला. त्यांनी तातडीने दरवाजा बंद केला.
शंभर क्रमांकावर फोन लावून पोलिसांना बिबट्या दिसल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या सहाव्या मिनिटांत मार्शल पोलिस त्यांच्या दारात व्हॅन घेऊन आले. तोपर्यंत बिबट्या घटनास्थळावरून वासवानी यांच्या शेजारच्या आवारात घुसला. विशाल सोनिगरा यांच्या साधारण पंधरा फूट उंचीच्या गॅलरीमध्ये बिबट्याने उडी घेतली. ते दृष्य पाहून घर मालकांनी घराचे दरावाजे लावून घेतले.
घराच्या गॅलरीमधून उडी मारून शेजारच्या आणखी दोन तीन घरांमध्ये बिबट्याने वावर केला. बिबट्या आल्याची बातमी कळाल्याने जवळपासच्या रहिवाशांनी दारे-खिडक्या बंद केल्या. बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरल्याने बघताबघता गर्दी झाली.
आवाज केल्याने वन्यप्राणही बिथरतात याची माहिती असणार्या नागरिकांनी गर्दीला थांत राहण्याचे आवाहन केले. दारे- खिडक्यांवर लक्ष ठेवून बिबट्याची माहिती पोलिस आणि रेस्क्यु टिमला दिली जात होती. त्यांनतर बिबट्या पुन्हा संत कबीर उद्यानात आला. उद्यानात वास्तव्यास असलेले कोळप हे बाहेर गेले होते.
त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी बिबट्या पाहिला. त्यांनी लगेच घराचा दरवाजा लावून घेतला तर दुसर्या खोलीत राहणारे सूरज ठाकुर त्यांचा भाऊ, आणि आई यांनीही लगेच दरवाजा लावून घेतला. दाराजवळच्याच अंधार असल्याने जागेत बिबट्याने तळ ठोकला. तेवढ्यात रेस्क्यु टिमने डार्ट मारून बिबट्यास बेशुध्द केले.
मोठ्या प्रमाणात झालेली जंगल तोड आणि पिकांचा बदललेला पॅटर्न यामुळे जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने खाद्याच्या व पाण्याचा शोधात बिबटे शहरांकडे येऊ लागले असून यापुढेही असे प्रकार घडत राहणार आहे. अशा वेळी विचलित न होता नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना पुन्हा जंगलात पाठविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक नीलिमकुमार खैरे यांनी व्यक्त केले.
निगडी परिसरातील नागरी वस्तीमध्ये पहाटेच्या वेळी कुत्र्याच्या मागावर आलेल्या सहा वर्षे वयाच्या एका बिबट्याची वनविभागाने रविवारी यशस्वीरीत्या सुटका केली. या पार्श्वभूमीवर खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, वन्यजीवांना पूर्वी घनदाट गवतांच्या जंगलांमध्येच पुरेसे पाणी व खाद्य उपलब्ध होत असे. परंतु, गेल्या काही वर्षांत झालेल्या जंगलतोडीमुळे हे वन्यजीव खाद्याच्या शोधात डोंगरांवरून मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत.
भात व तृणधान्यांच्या जागी नगदी उत्पन्न देणारी ऊस शेती वाढू लागली. त्यामुळे हरणे व अन्य प्राण्यांची संख्या कमी होऊन ही ऊस शेतीच वन्यजीवांना निवार्याचे ठिकाण वाटू लागली. हरणाची शिकार करण्याऐवजी तेथे आढळणार्या घुशी, कुत्री, मेंढ्या, कोंबड्या हेच त्यांचे खाद्य झाले. त्यातूनच खाली वाकून काम करणार्या महिला व मुलेही त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत असल्याने त्यांच्यावरही हल्ले होऊ लागले. अशा हल्ल्यापासून बचावासाठी सर्वांनीच काही किमान दक्षता घेणे गरजेचे आहे.
वन्यजीव दिसल्यानंतर नागरिकांनी न घाबरता, सुटकेसाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. त्यांना हुसकाविण्यासाठी त्यांना दगड मारतात, हल्ला गुल्ला केला जातो. तसेच, कित्येक जण लाठ्या- काठ्या घेऊन त्याच्या मागे लागतात. त्यामुळे घाबरलेले हे वन्यजीव वाट फुटेल तसे धावतात, जागा मिळेल तेथे लपायचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांना काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे, असेही खैरे यांनी सांगितले.
शहरात अजून एक बिबट्या?
या बिबट्यासह त्याच्यासोबत आणखी एक बिबट्या असल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसरा बिबटा पाहिल्याचे अद्याप कोणीही सांगितलेले नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले.
सर्वात वेगवान रेस्क्यु ऑपरेशन
आजवर शहर, उपनगर आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनेक बिबटे वन विभागाने पकडले आहेत. मात्र, नागरिकांची गर्दी... कोलाहल... गोंगाट यामुळे भेदरलेला बिबट्या ठिकठिकाणी लपून बसल्याने वन विभागाला रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या आहेत. मात्र, रविवारी वन विभागाच्या सहा कर्मचार्यांनी अवघ्या दिड तासांत जे रेस्क्यु ऑपरेशन केले, त्याची सर्वात वेगवान रेस्क्यु ऑपरेशन म्हणून नोंद झाली आहे.
एकच डार्ट अन् बिबट्या बेशुद्ध
पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले की, या बिबट्याचे वय सहा वर्षे असून तो प्रौढ आहे. 57 किलो वजनाचा हा बिबट्या मध्यरात्रीच निगडी भागातील टेकड्यावरून कुत्र्यांचा माग काढत आला. नागरिकांनी पाहिल्याने आम्हाला लवकर माहिती मिळाली. पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर आणि बावधनमधील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राच्या नेहा पंचमिया यांच्यासह वन विभागाच्या सहा कर्मचार्यांच्या टिमने आसपासचा परिसर सील केला.
त्यामुळे बिबट्याला पकडणे सोपे गेले. इतर वेळी बिबट्या लपून बसल्याने त्याला बेशुद्ध करणारा डार्ट मारणे अशक्य होऊन जाते. मात्र, या प्रकरणात बिबट्या उद्यानात आणि विरळ वृक्षांमध्ये लपला असल्याने पहिल्याच डार्टमध्ये तो बेशुद्ध झाला. त्यामुळे रेस्क्यु ऑपरेशन सहज सोपे आणि निर्विघ्न पार पडले.
223 बिबट्यांना जेरबंद करणारी वाघीण!
निगडी परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याची कामगिरी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक संचालक नेहा पंचमिया व नचिकेत उत्पात यांनी केली असून, गेल्या सहा वर्षांत मानवी वस्तीत शिरलेल्या तब्बल 223 बिबट्यांना पकडून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
इंग्लडमधून मास्टर्स डिग्री घेऊन परतलेल्या नेहा या प्राण्यांबद्दलच्या प्रेमापोटी गेल्या 19 वर्षांपासून रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था चालवित आहेत. रस्त्यावरील भटकी कुत्री आणि अन्य प्राण्यांच्या पुनर्वसनापासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. 6 वर्षांपासून वन विभागाच्या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये त्या सहभागी होत आहेत.पूर्ण वाढ झालेल्या या बिबट्याचे वय व वजन विचारात घेऊनच डॉ. कल्याणी ठाकूर यांनी त्याच्यावर दोन डार्ट मारले आणि त्याला दीड तासात जेरबंद करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
निगडीत बिबट्या कोठून आला होता, याचा मार्ग अद्याप कळलेला नाही. कारण, आपल्या परिसरात बिबट्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तो जवळच्याच परिसरातून आला असावा, असा अंदाज आहे. जुन्नर पुण्यापासून बर्यापैकी लांब आहे. त्यामुळे बिबट प्रवण क्षेत्रातून आला नसावा.
- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग.