

पुणे: राज्यात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विधानसभेत सत्ताधार्यांनी विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. निवडणूक होऊन अद्याप याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. सरकारला विरोधी पक्षनेता निवडण्याची भीती वाटत असावी, त्यामुळे यावर निर्णय होत नसावा, असा टोला काँग्रेसचे पुणे शहर निरीक्षक सतेज पाटील यांनी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
काँग्रेस भवनमध्ये सोमवारी (दि. 7) काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत माजी मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अभय छाजेड, अविनाश बागवे, सौरभ अमराळे उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, राज्यात लोकशाही टिकवणे गरजेचे आहे, राज्यात महापालिका व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका देखील प्रलंबित आहेत. मला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पुणे शहर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने शहरात पक्षसंघटना बळकट करण्यासाठी नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने मांडल्या जातील.
...त्याचा पक्षावर परिणाम नाही
काँग्रेस पक्षात अनेक स्थित्यंतरे आली आहेत. अनेक लोक पक्षात आले आणि गेले. पण, पक्ष आजही खंबीरपणे टिकून आहे. त्यांच्या जाण्याने कोणताही परिणाम पक्षावर झालेला नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा निषेध
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत सतेज पाटील म्हणाले की, गरोदर महिलेला उपचार नाकारणे निषधार्ह आहे. एखादा रुग्ण दवाखान्यात जातो तेव्हा त्याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. याप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.