

पुणे : राज्यभरातून सातारा जिल्ह्यातील पाणी सर्वाधिक चांगले असल्याचे जलजीवन मिशनच्या या वर्षातील तपासणीत आढळून आले आहे. साताऱ्यातील प्राप्त नमुन्यांपैकी केवळ ०.३७ टक्केच पाणी दूषित असून हे प्रमाण अत्यंत तुरळक असल्याचे अधिकारी सांगतात. त्याचबरोबर ठाणे (०.४८), रत्नागिरी (०.६१), चंद्रपूर (०.९४) असे शून्य टक्क्यापेक्षा कमी दूषित पाणी असलेले जिल्हे असून येथील पाणी पिण्यासाठी चांगले असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून सांगण्यात आले.
राज्यामधील नांदेड जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता सर्वात खराब असून नांदेडपाठोपाठ नागपूर, हिंगोली, परभणी आणि सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी दूषित असून इतर जिल्ह्यांमधील दूषित पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे अहवालातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या गुणवत्ता विभागाकडून नागरिकांना घराघरात नळ, कुपनलिकांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व्यवस्थापन माहिती प्रणाली विभागामार्फत केली जाते. त्यानुसार राज्यभरातील ३४ जिल्ह्यातून पाच लाख ६१ हजार १०० पाण्यांचे नमुने गुणवत्ता तपासणी विभागाकडे प्राप्त झाले होते.
या नमुन्यांची प्रयोगशाळांमध्ये रासायनिक आणि जीवाणूजन्य निकषाच्या आधारानुसार रसायन, क्षार, धातू असे या निरनिराळ्या निकषांसह जीवाणूंचे मापदंड तपासले आहेत. त्यापैकी २४ हजार ५७५ नमुन्यांची गुणवत्ता खराब असून तपासलेल्या प्रत्येक १०० नमुन्यांपैकी ४.५ नमुने दूषित आहे, असे विभागाच्या तपासणी अहवालात नमूद केले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातून १९ हजार ७४ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी रासायनिक दोष असलेले दोन हजार ९५३ आणि जैविक निकषानुसार एक हजार ९२६ असे एकूण १२ हजार ५२४ नमुने (२४.७३ टक्के) दूषित असून यामध्ये प्रामुख्याने फ्लोराईड आणि नायट्रेटचे मापदंड कमी-अधिक आहेत.
स्थानिक पातळीवर या पाण्याचे दीर्घकाळ सेवनाने आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून संबंधित गुणवत्ता प्रभाव क्षेत्रात जिल्हा परिषद आणि जिल्हा विकास अधिकाऱी पातळीवर तातडीने प्रतिबंधात्मक आणि सुरक्षित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोकण विभागातील पाणी गुणवत्तापूर्ण
राज्यात प्रशासकीय आणि महसुली सहा विभागांतील सरासरीनुसार कोकण विभागातील जिल्ह्यांचे पाणी उत्तम आणि गुणवत्तापूर्ण आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पिण्याची परिस्थिती सर्वसाधारण आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आणि विदारक असल्याचे सरासरीवरून दिसून आले आहे.