सासवड: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात रात्रीच्या वेळी भरधाव बुलेट दुचाकी चालवून तिच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश तसेच फटाक्यासारखे आवाज काढणार्या आणि कोयता हवेत फिरवून दहशत माजविणार्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याशिवाय 30 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील केल्याची माहिती सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
समर्थ श्रीकांत मुसळे, प्रशांत साळुंके (दोघेही रा. भेकराईनगर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार (नाव समजू शकले नाही) पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन टेकडीजवळ बुधवारी (दि. 19) पहाटे दोन ते तीनजण बुलेट दुचाकीच्या सायलेन्समधून कर्णकर्कश फटाक्यासारखे आवाज काढत असून, एकजण हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मुसळे व साळुंकेला ताब्यात घेतले, तर या दोघांचा साथीदार पसार झाला. दरम्यान शहरातील वाघिरे महाविद्यालय, पुरंदर कॉलेज, जेजुरी नाका, एसटी बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.
यामध्ये 30 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, सहायक फौजदार सुनील भिसे, पोलीस हवालदार सुरज नांगरे, गणेश पोटे, अक्षय चिले, प्रणय मखरे, वैभव मदने, अविनाश होळकर, भगवान थोरवे, रूपेश भगत, तुषार लोंढे, जब्बार सय्यद, विकास ओमासे, आबासाहेब बनकर, तेजस शिवतरे, राहुल चव्हाण, चालक राहुल भुजबळ, पोलीस मित्र शुभम घोडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.