

सासवड : पुरंदर तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या सीताफळाचा हंगाम सध्या सुरू असून, या हंगामात ‘फुले पुरंदर’ वाणाची सीताफळे सरस ठरत आहेत. भरपूर गर, उत्तम आकार व अप्रतिम चव यामुळे या वाणाला मोठी मागणी आहे.
रविवारी (दि. 31) सासवड बाजारात 1 हजार क्रेटची आवक झाली. यामध्ये राजेवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी संदीप श्रीरंग कडलग यांच्या दोन क्रेटना तब्बल 8 हजार 400 रुपये (प्रति क्रेट 4 हजार 200 रुपये) इतका उच्चांकी भाव मिळाला. हा दर हंगामातील सर्वोच्च ठरला असून, एका मोठ्या आकाराच्या सीताफळाची किंमत जवळपास 100 रुपये इतकी बसली.
सीताफळ विक्रीच्या वेळी व्यापारी व शेतकर्यांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. कडलग यांच्या बागेत 2600 झाडांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. शेणखतावर भर दिल्यामुळे फळांचा रंग, आकार व दर्जा उत्कृष्ट राहतो, असे त्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील सासवड व आसपासच्या भागातील सीताफळे दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, जयपूर, गोवा, हैदराबाद आणि बंगळुरू या महानगरांत पाठवली जातात. तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टरवर सीताफळ बागायती असून, स्थानिक व्यापार्यांसह परराज्यातील व्यापारीही खरेदीसाठी येतात.